मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सोहळा 6 जून रोजी कोल्हापुरात साजरा करण्यात आला. त्याच दिवशी शहरातल्या तिघा जणांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर टिपू सुलतान आणि औरंगजेब यांचे कथितरित्या उदात्तीकरण करणारे स्टेटस ठेवले. यावरून शहरात जातीय तणाव निर्माण झाला होता. आता याच मुद्द्यांवरून राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
'फडणवीसांच्या वक्तव्याने वाद चिघळला?' : कोल्हापुरात झालेल्या दंगलीबाबत बोलताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी 'औरंग्यांच्या औलादी' असं वक्तव्य केल्याने हा वाद आणखी चिघळला. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, राज्यातील काही जिल्ह्यात अचानक औरंगजेबांच्या औलादींची पैदास कशी झाली? त्याचे फोटो स्टेटसला ठेवून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम होत आहे. या कारणामुळे तणाव निर्माण होतो आहे. अचानक औरंग्याच्या इतक्या औलादी महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या आहेत? हे आपल्याला शोधावे लागणार आहे. त्याचबरोबर या सर्वांचा बोलविता धनी कोण आहे, हे शोधल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही, असे फडणवीस म्हणाले होते.
'गोडसेची औलाद कोण आहे?' : फडणवीस यांच्या वक्तव्याला एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिले. ओवैसी यांनी आपल्या शैलीत आक्षेप नोंदवत नथुराम गोडसे आणि आपटेचा उल्लेख केला. ओवैसी म्हणाले, 'गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की ते औरंग्याच्या औलादी आहेत. कोण कोणाची औलाद आहे तुम्हाला सगळं माहिती आहे. पण मग गोडसेची औलाद कोण आहे? आपटेंची औलाद कोण आहे? याचे सुद्धा उत्तर द्या, असा प्रतिहल्ला ओवैसी यांनी केला.
'धार्मिक रंग देणं योग्य नाही' : या वक्तव्यांवरून राज्यात राजकीय वातावरण तापले असताना यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, 'अशी वक्तव्यं करून राज्याचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. हे फार चुकीचे आहे.'
कोणी मोबाईलवर स्टेटस ठेवलं म्हणून रस्त्यावर उतरून त्याला लगेच धार्मिक रंग देणं हे काही योग्य नाही. तसेच सत्तेत असलेल्यांनी अशा गोष्टींना प्रोत्साहन देणंही अजिबात चांगले नाही. राज्यात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण जर राज्य सरकारच लोकांना भडकावू लागलं, तर हे काही चांगले लक्षण नाही. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस
गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अपयश : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील या घटनेवर आपली भूमिका मांडली. 400 वर्षांपूर्वी गाडल्या गेलेल्या औरंगजेबचा वापर राज्यात दंगली भडकवण्यासाठी केला जातो आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यांनी भाजपवर निशाणा साधत कर्नाटक मध्येही हा प्रयोग करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याचे ते म्हणाले. कोल्हापुरात झालेली दंगल हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अपयश असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :