मुंबई - कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मुंबईकरांमध्ये लॉकडाऊनची धास्ती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना चाचणी करण्याकडेही शासनाचा भर आहे, मात्र गोवंडी शिवाजीनगर या भागातून लसीकरणाबाबत एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथील एका नामांकित लॅबमध्ये पैशांच्या आमिषाने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना निगेटिव्ह रिपोर्ट देत असल्याची बाब समोर आली आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी लॅब चालकाला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.
मुंबईच्या गोवंडी शिवाजी नगर भागात थायरोकेयर या प्रसिद्ध लॅबच्या डिस्ट्रिब्युटरने अवघ्या चार हजार रुपयात कोव्हिड पॉजिटिव्ह रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह देण्याचा प्रताप केला आहे. या प्रकरणी थायरोकेयरने केलेल्या तक्रारीवरून या लॅब चालकाला अटक करण्यात आली आहे.
चार ते पाच हजारात पाहिजे तसा कोरोना अहवाल-
थायरोकेयर लॅबची शिवाजी नगर येथे एक शाखा आहे. अब्दुल साजिद खान असे त्या लॅब चालकाची याची एजन्सी आहे. काही दिवसांपूर्वी त्याने रमेश खबरानी या व्यक्तीचे कोव्हिडं चाचणीसाठी नमुने घेतले होते. मात्र त्यांना ते पॉझिटिव्ह असताना निगेटिव्ह असल्याचा अहवाल दिला. अशा प्रकारे या लॅबमधून अनेक अहवाल गेल्याच संशय आहे. अवघ्या चार ते पाच हजार रुपयात इथे हवा तसा अहवाल मिळत असल्याची माहिती मिळते आहे. या प्रकरणी पोलिसांनी अब्दुलला जरी अटक केली असली तरी ज्यांनी हे अहवाल बनवून घेतले आहेत, त्यांच्या बाबत काय पावले उचलली आहेत, हे मात्र अस्पष्ट आहे. मात्र एकीकडे मुंबईत कोरोनाचे रुग्ण भराभर वाढत असताना काही पैशांसाठी लॅबचालक अशा प्रकारे, कोरोना चाचणी अहवालांचा काळा बाजार करताना दिसत आहेत.
मुंबईमध्ये लॉकडाऊन ?
राज्यात अनेक ठिकाणी कोरोना रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारला चिंता सतावत आहे. नाशिक, औरंगाबाद, जळगाव, अमरावती अशा अनेक ठिकाणी प्रशासनाकडून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईतही गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत असून लॉकडाऊन लागू करण्यासंबंधी चर्चा सुरू आहे. मात्र मुंबईत लॉकडाऊन होणार की नाही? हे अजूनही अनिश्चित आहे.
हेही वाचा - सचिन वाझे यांची अखेर क्राईम ब्रँचमधून बदली; विधानपरिषदेत विरोधकांचा गदारोळ
हेही वाचा - मुंबईत लसीकरण केंद्रांची संख्या १००वर नेण्याचा विचार, महापालिकेने दिली माहिती