मुंबई - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार केलेल्या रेणू शर्माचा काल (शनिवार) पुन्हा जबाब नोंदवला गेला. शर्मा यांनी सात तास सहायक पोलीस आयुक्त कार्यलयात जबाब दिला. मात्र, अजूनही पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करून घेतलेली नाही. जर तक्रार दाखल करून घेतली नाही तर, सोमवारी स्थानिक न्यायालयात जाण्याचा इशारा रेणू शर्मा यांच्या वकिलांनी दिला आहे.
काय आहे प्रकरण -
रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. या महिलेचा आरोप आहे की, 'धनंजय मुंडे यांनी मला सांगितले की तुम्हाला गायक बनायचे असेल तर मी चित्रपट जगतातील बड्या चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांसमवेत तुझी भेट करुन देतो आणि बॉलीवूडमध्ये लॉन्च करेन. याचे आमिष दाखवून त्यांनी माझ्या इच्छेविरूद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुंडे यांनी सतत लैंगिक अत्याचार केले. जेव्हा-जेव्हा माझी बहीण कामानिमित्त बाहेर पडली, तेव्हा ते मला शारीरिक संबंध बनवण्यास भाग पाडत असत. बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपाने धनंजय मुंडे यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. त्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, धनंजय मुंडे यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.
या महिलेच्या बहिणीसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना माहित होती. या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी, अशी दोन मुले झाली. या दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे. ही महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत, अशी माहिती मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केली.