मुंबई - देशात मोठ्या राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण जास्त आहे. देशभरात सर्वाधिक महिलांवर अत्याचार घडण्याच्या घटना उत्तरप्रदेशमध्ये नोंद झाल्या आहेत. तर, महिला अत्याचारात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सांगितले. महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या तक्रारी जास्त असल्याचे सांगितले जात असले तरी तितकी कुटुंब समोर आली नसल्याचेही शर्मा म्हणाल्या.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणांचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शर्मा बोलत होत्या. यावेळी बोलताना आम्ही स्व:ताहून काही केसेस दाखल केल्या आहेत. काही लोकांना आम्हाला भेटायचे होते म्हणून इथे आल्याचे त्यांनी सांगितले. गेले 5 वर्ष मी महिला आयोगात काम करत आहे. या सर्व वर्षात उत्तर प्रदेशमध्येच सर्वाधिक महिला अत्याचाराच्या घटना नोंद झाल्याचे शर्मा म्हणाल्या. मोठ्या राज्यात महिलांवर अत्याचार मोठ्या प्रमाणात होतात असेही शर्मा म्हणाल्या.
लव्ह जिहाद कुटुंब पुढे आली नाहीत -
लव्ह जिहादबाबत मोठ्या प्रमाणात संघटना तक्रारी करत आहेत. मात्र, अशी कुटुंब पुढे आलेली नाहीत. औरंगाबादमधील एकच महिला पुढे आली आहे. अशा केसेस आणखी पुढे येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लग्न इतर धर्मात होणे चांगले आहे. मात्र, महिलांना धर्म बदलण्यासाठी जबरदस्ती करू नये असेही शर्मा म्हणाल्या. केरळमध्ये लव्ह जिहाद, धर्म परिवर्तनाच्या माध्यमातून महिला अत्याचारांच्या केसेस जास्त असल्याचे शर्मा यांनी सांगितले.
कामलनाथ यांच्यावर काँग्रेसने कारवाई करावी -
काँग्रेस नेते कमलनाथ यांनी आपल्या पक्षातील एका महिलेला 'आयटम' म्हणून संबोधले होते, त्यांना काल नोटीस दिली आहे. तसेच निवडणूक आयोगालाही तक्रार दिली आहे. एका महिलेला आयटम बोलवणे चुकीचे आहे. कामलनाथ चित्रपटातील व्हिलनप्रमाणे बोलत होते. त्यांनी मी लिस्टमधील आयटमबद्दल बोलत होतो असे म्हटले आहे. हे योग्य वाटत नाही. काँग्रेसच्या अध्यक्षा एक महिला आहेत त्यामुळे त्यांनी कमलनाथ यांच्या विरोधात कारवाई करावी असे शर्मा यांनी म्हटले आहे. तर, उत्तर प्रदेशमध्ये भाजप कार्यकर्त्यानेही महिलेबद्दल अपशब्द वापरले आहेत. त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे शर्मा यांनी स्पष्ट केले. अमित मालविया प्रकरणी उत्तर आल्यावर कारवाई केली जाईल असे शर्मा म्हणाल्या.
कोविड सेंटरमध्ये महिला असुरक्षित -
कोविड सेंटरमधून महिला अत्याचाराच्या 11 तक्रारी आल्या आहेत. या तक्रारी मिडियामधून आम्हाला मिळाल्या आहेत. त्यापैकी पोलिसांकडे 9 केसेस दाखल आहेत. कोविड सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांचे व्हेरिफिकेशन न करता कामावर ठेवले जाते. तिथे सीसीटीव्ही नसतो यामुळे अत्याचार होतात. राज्य महिला आयोगाकडे अशा तक्रारी आल्या आहेत. मात्र, राज्यात महिला आयोग अस्तित्वात नाही. वेळ पडल्यास आमचा एक सदस्य येऊन दर महिन्याला आढावा घेईल असेही शर्मा यांनी सांगितले.
महिला कायद्यांची अंमलबजावणी नाही -
कोविडच्या काळात राज्यात तीन महिन्यात पोक्सो कायद्यानुसार 188 केसेस दाखल झाल्या आहेत. मनोधरी योजनेची राज्यात अंमलबजावणी होत नाही. वन स्टॉपने काम चांगले केले. निर्भया फंडचे वाटप केला जात नाही. दिशा कायदा बनवला नाही, तो लवकर बनवावा असे शर्मा म्हणाल्या.
हाथरस प्रकरण -
हाथरस प्रकरणात 14 सप्टेंबरला उत्तर आले आहे. अत्यंसंस्काराबाबत डिजीपीला 2 नोटीस दिल्या आहेत. या प्रकरणी सीबीआय चौकशी करत आहे. त्यामुळे आम्ही बाजूला झालो आहे. मात्र, आम्ही कुटुंबाच्या संपर्कात आहोत असेही शर्मा यावेळी बोलताना म्हणाल्या.
हेही वाचा - 'राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षाही राजकारणात व्यस्त'