मुंबई - शहरातील धोकादाक ठरलेल्या 29 पुलांपैकी पश्चिम उपनगरातील 7 पुलांचे ऑक्टोबरपासून नव्याने बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका 95 कोटी 42 लाख 22 हजार 887 रुपये खर्च करणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून स्थायी समितीत देण्यात आली आहे.
हेही वाचा - दुरुस्तीचे काम..! दोन दिवस अंधेरी, वांद्रे, धारावीत पाणीपुरवठा बंद
मुंबई महानगरपालिका हद्दीतील महापालिकेच्या अखत्यारीतील शहर विभाग, पश्चिम उपनगरे व पूर्व उपनगरे येथील 6 मीटरपेक्षा जास्त लांबी असलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट (संरचनात्मक सर्वेक्षण) करण्यात आले होते. त्यावेळी 14 पूल धोकादायक स्थितीत आढळले होते. मात्र, 14 मार्च 2019 रोजी झालेल्या हिमालय पूल दुर्घटनेत 7 जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील सर्वच पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. स्ट्रक्चरल ऑडिटर देसाईच्या ‘बोगस’ ऑडिट रिपोर्टमुळेच हिमालय पूल दुर्घटना घडल्याचे समोर आल्यानंतर तत्कालीन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबईतील सर्वच पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले होते.
हेही वाचा - पवईतील गणेश मंडळाने भरले, होतकरु विद्यार्थ्यांचे वर्षभराचे शालेय शुल्क
नव्याने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आणखी 15 पूल धोकादायक स्थितीत आढळले. धोकादायक असलेल्या एकूण 29 पुलांमध्ये पूर्व उपनगरात 7, पश्चिम उपनगरात 19 आणि शहर विभागात 3 धोकादायक पूल आढळले. त्यामधील अतिधोकादायक 8 पूल पाडण्यात आले. तर काही पूल वाहतुकीस बंद करण्यात आले.
वाहतूक बंद झाल्याने वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली असून नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे धोकादायक असलेल्या 7 पुलांच्या डिझाईन, बिल्ट आणि ट्रान्स्फर अशा डीबीटी तत्त्वावर निविदा मागविण्यात आल्या. हे सातही पूल पश्चिम उपनगरातील आहेत. मे 2020 पर्यंत सातही पूल खुले करण्यात येणार आहेत.
या पूलांचे होणार बांधकाम -
- वांद्रे पश्चिम हंसभुग्रा रोड
- वांद्रे पश्चिम जुहू तारा रोड
- अंधेरी पूर्व धोबी घाट-मजास नाला
- अंधेरी पूर्व मेघवाडी जंक्शन-मजास नाला
- गोरेगाव पिरामल नाला-इन ऑर्बिट मॉल
- मालाड लिंक रोड-डी मार्ट (पी उत्तर)
- रतन नगर, बोरिवली, दहिसर नदी (आर मध्य)