मुंबई : वीर सावरकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मोठी घोषणा केली. आता वांद्रे-वर्सोवा सी लिंक यापुढे 'वीर सावरकर सागरी सेतू' म्हणून ओळखला जाणार आहे. रविवार 28 मे रोजी वीर सावरकरांची 140 वी जयंती होती. त्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी या नामकरणाची घोषणा केली. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानंतर सरकारने हा निर्णय निवडणुका तोंडावर असल्याने घेतल्याचा आरोप सध्या विरोधी पक्षाकडून केला जातो आहे. सरकारच्या या निर्णयाबाबत सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न ईटीव्हीने केला आहे.
मुंबईकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया : सी लिंकच्या नामकरणाबाबत मुंबईकरांच्या प्रतिक्रिया संमिश्र आहेत. काही लोकांनी याचे समर्थन केले असून काही लोकांनी याला निवडणूकीच्या दृष्टीकोनातून घेतलेला निर्णय असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला हा निर्णय अतिशय योग्य आहे. हा निर्णय म्हणजे सावरकरांना दिलेली आदरांजली आहे. इतरही अन्य ठिकाणी जे काही रस्ते, पूल असतील त्यांना देखील देशाच्या स्वातंत्र चळवळीतील स्वातंत्र्य सैनिकांची नावे दिली जावीत. त्यामुळे ज्या स्वातंत्र सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात जे योगदान दिले त्यांचा यथोचित सन्मान होईल. - नागरिक
'निवडणुका पाहून निर्णय घेतला' : एक नागरिक म्हणाले की, 'इतके दिवस झाले सरकारला या आधी कधी सावरकर आठवले नाहीत. मात्र आता 2024 च्या आगामी निवडणुका समोर असताना सरकार हा निर्णय घेत आहे. यामागे नक्कीच राजकारण आहे. लोकांना मुख्य मुद्द्यांपासून बाजूला ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशात इतर अनेक प्रश्न असताना कुठलातरी एक छोटा मुद्दा उभा करून मूळ मुद्द्यांना बगल दिली जाते. त्यासाठीच सरकार हे प्रयत्न करत आहे.'
अनेक दिवसांपासून सुरू होती चर्चा : वांद्रे वर्सोवा सी लिंकचे नाव बदलण्याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. यापूर्वीही राज्य सरकार सी लिंकचे नाव बदलू शकते असे बोलले जात होते. रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी, 'नवीन संसद भवन हे नवीन भारताचे प्रतीक असल्याचे म्हटले होते. तसेच वीर सावरकर जयंतीनिमित्त नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणे ही राज्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :