मुंबई - शासनाने राज्यासह जिल्ह्यामध्ये गतवर्षी मार्च महिन्यात टाळेबंदी जाहीर केली होते. याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मागील वर्षापासून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासन व प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. असे असले तरी अद्याप कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढताना दिसत आहे. यामुळे पुन्हा एकदा कोरोनाची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकांचे मत काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न 'ईटीव्ही भारत'च्या वतीने करण्यात आला आहे.
मागील वर्षी कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अनेक निर्बंध लावण्यात आली होती. यामध्ये सर्वात जास्त ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले होते. मॉर्निंग वॉक, शतपावली अभावी कट्ट्यांशी त्यांचा संपर्क तुटला होता. अनेक दिवस मित्र-मैत्रिणींसोबत प्रत्यक्ष संवाद तुटल्याने, आरोग्याच्या तपासणीसाठी दवाखान्यांचा शोध, जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी परावलंबी व्हावे लागल्याने या ज्येष्ठांसाठी हा टाळेबंदीचा काळ म्हणजे, कोंडमारा ठरत होता. कुठे तरी हे वर्ष चांगले जाईल या आशेत असताना पुन्हा टाळेबंदीची भीती वाटू लागली आहे. बंगालमध्ये लाखो लोकांच्या उपस्थितीत सभा प्रंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहे. पण, तिथे कोरोना नाही का ? मग महाराष्ट्रात कोरोनाची भीती का दाखवली जाते. केंद्रीय पथक सांगते की लग्न समारंभामूळे महाराष्ट्रात कोरोना वाढतो आहे. मग बंगालची गर्दी केंद्रीय पथकाला दिसत नाही का, असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्रात टाळेबंदी लावू नये, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांनी दिल्या आहेत.
हेही वाचा - लॉकडाऊनची वर्षपूर्ती : वर्षभराचा काळ सर्वांसाठीच ठरला कसोटीचा