मुंबई - केंद्र सरकारने मंजूर केलेला कृषी कायदा राज्यात तत्काळ लागू करावा, तसेच या विधेयकासाठीचा अध्यादेश राज्य सरकारने स्थगित केला आहे, ती स्थगिती तत्काळ उठवावी, या प्रमुख मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंत्रालयासमोर घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे येथील पोलीस यंत्रणाही अवाक झाली होती.
रयत क्रांती संघटनेचा विजय असो, सदाभाऊ खोत तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे, अशा घोषणा देत रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे मंत्रालय परिसरात काही वेळ पोलिसाची तारांबळ उडाली होती. अचानक झालेल्या आंदोलनामुळे काहीवेळ ते हतबल झाल्याचे दिसून आले होते. मात्र, लगेच त्यांना ताब्यात घेत, पोलिसांनीच पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घडवून दिली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर काही आंदोलनकर्त्यांना सोपस्कार म्हणून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याची कारवाई करण्यात आली.
हेही वाचा - मुंबईकरांना पुरवठा केले जाणारे पाणी स्वच्छच, दुषित पाण्याचे प्रमाण अवघे ०.७ टक्के
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाच्या अध्यादेशाला पणन मंत्री व त्यांच्या सचिवांनी स्थगिती दिली आणि ते कायदे लागू होऊ दिले नाहीत. त्यामुळे आज आम्ही त्या स्थगिती दिलेल्या आदेशाची होळी केली आणि संताप व्यक्त केला, अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे विदर्भ प्रमुख आशिष वानखेडे यांनी यावेळी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. राज्य सरकारने तत्काळ केंद्राचा कृषी कायदा लागू करावा, यासाठी आमचे हे आंदोलन होते अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.