मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आणि आत्ताही आचारसंहितेचे दररोज उल्लंघन करत सुटले आहेत. हे निवडणूक आयोगाला दिसते असते. त्यामुळे आयोगाने किमान मोदींवर प्रचारबंदीची कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन यांनी केली.
मोदी हे घटना, कायदे, प्रथा आणि परंपरा मानणारे म्हणून कधीच प्रसिद्ध नव्हते. या निवडणुकांच्या काळात देखील त्यांनी हेच सिद्ध करण्याचा चंग बांधला असल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे.
मिरवणुकीने मतदानाला जाणे किंवा मतदान करून आल्यानंतर एक बोट वर करून मिरवणुकीने मतदान केंद्राच्या बाहेर पडणे हा त्यांचा आवडता खेळ आहे. निवडणूक आचार संहितेप्रमाणे हा गैरप्रकार असून त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदला जाऊ शकतो. मात्र, दुर्दैवाने नरेंद्र मोदींच्या दहशतीखाली सर्व केंद्रीय संस्था या बोटचेपेपणाने वागत असल्याने निवडणूक आयोगाने देखील याचा केवळ अहवाल मागवला आहे. मात्र, ठोस कारवाई केली नाही. यापुढे निवडणूक आयोग त्यांच्यावर प्रचारबंदी किंवा तत्सम काही कारवाई करील, असा विश्वास लोकांना वाटत नाही. आपली विश्वासार्हता पुन्हा मिळवायची असेल तर आयोगाने मोदींवर कारवाई करावी, असे ते म्हणाले.