मुंबई- अभिनेत्री कंगना रणौत आरपीआयमध्ये आल्यास तिचे स्वागत करेन, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. आठवले यांनी कंगनाची मुंबईतल्या घरी जाऊन भेट घेतली. अभिनेत्री कंगना आणि शिवसेना यांच्यातला वाद शिगेला पोहोचला असताना भाजपासह आरपीआय आठवले गटानेही या वादात उडी घेतली आहे.
कंगनाच्या कार्यालयात अनधिकृत बांधकाम केले गेल्याचा ठपका ठेवत मुंबई पालिकेने ते तोडून टाकले. त्याविरोधात कंगनाने उच्च न्यायालयातून स्थगिती आणली. यावरुन रामदास आठवले यांनी शिवसेना आणि मुंबई महानगरपालिकेवर टीका केली. सूड भावनेने कंगनाला लक्ष्य केले जात असल्याचे ते म्हणाले. कंगना ड्रग्ज घेत असल्याचे चुकीचं वृत्त सामनाने दिले. त्यामुळे सामना आणि संजय राऊत यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करा, अशी मागणी यांनी केली आहे. कंगनासोबत आठवलेंनी तासभर चर्चा केली. यावेळी कंगनाने राजकीय पक्षात प्रवेश करण्यात रस नसल्याचे सांगितले, असे त्यांनी म्हटले.
तुम्हाला मुंबईत घाबरण्याची आवश्यकता नाही. मुंबई सगळ्यांची आहे. देशाची आर्थिक राजधानी आहे. सगळ्यांना राहण्याचा अधिकार आहे. आरपीआय कायम तुमच्यासोबत असेल, अशी ग्वाही आठवले यांनी कंगनाला दिली. भिंतीचे नुकसान झालेय. फर्निचरचे नुकसान झाले आहे. त्याविरोधात मी न्यायालयात जाणार आहे, असे कंगनाने सांगितल्याची माहिती आठवलेंनी दिली. मुंबई पालिकेकडून नुकसानभरपाई मिळायला हवी, असेही कंगनाने म्हटले. तुम्हाला पालिकेने नोटीस द्यायला हवी होती, असे यावेळी रामदास आठवलेंनी सांगितले.
कंगनाला मुद्दाम त्रास दिला जात आहे. मुख्यमंत्री, पालिका अधिकाऱ्यांशी याबाबत बोलणार आहे. कंगना इथे आल्यानंतर नोटीस द्यायला हवी होती. ज्या अधिकाऱ्यांनी अशी कारवाई केली आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. सूडभावनेनेच ही कारवाई केली गेली आहे, असे रामदास आठवलेंनी म्हटले. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी कंगनाने योग्य भूमिका मांडली होती. जर पुरावा नसताना सामनाने देखील काही छापले असेल, तर सामनावर आणि संजय राऊतांवर देखील कारवाई व्हायला हवी’, असे आठवलेंनी म्हटले. सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकारणाची सीबीआयने चौकशी करावी, अशी मागणीही आठवलेंनी केली.