मुंबई - कोरोना विषाणूने महाराष्ट्रभर थैमान घातले आहे. अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर आता रामदास आठवले यांच्या निवासस्थानी 200 पोलिसांना आर्सेनिक अल्बम औषधाचे आज वाटप करण्यात आले. या गोळ्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते बांद्रा येथील निवासस्थानी पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच गरजूंना आर्सेनिक अल्बम या गोळ्या मोफत वाटण्यात आल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर एकूण 1 हजार लोकांना आर्सेनिक औषध वाटण्यात येणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.
घाटकोपरमधील शांती निकेतन रुग्णालयाचे प्रमुख डॉ. प्रफुल्ल लोखंडे आणि डॉ. प्रियांका लोखंडे यांनी आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे आठवले यांच्या हस्ते वाटप केले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, खेरवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पालम, डॉ. प्रफुल्ल लोखंडे, डॉ प्रियंका लोखंडे आदी उपस्थित होते.