मुंबई - शुक्रवारी आरपीआय नेते रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. भाजपच्या वतीने रामदास आठवले यांनी शरद पवार यांची भेट घेतली. आठवले-पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला एकच उधाण आले आहे. मात्र, अडचणीच्या काळात नेहमीप्रमाणेच सल्ला घेण्यासाठी पवारांकडे आलो असल्याचे रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - योग्यवेळी घेणार निर्यण, उद्धव ठाकरेंना सत्ता स्थापनेचे सर्व अधिकार - एकनाथ शिंदे
राज्यात निर्माण झालेल्या पेचासंदर्भात ज्येष्ठ नेत्याकडून सल्ला घेण्यासाठी आपण पवारांची भेट घेतल्याचे यावेळी रामदास आठवले यांनी सांगितले. परंतु, 'भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीला जनादेश मिळाला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी मिळून सरकार स्थापन करावे, असे पवारांनी सांगितले असल्याचे आठवले म्हणाले.
हेही वाचा - सेनाभवनातील बैठकीत उद्धव ठाकरेंकडून जिल्हाध्यक्षांना शेतकरी मदतीचे आदेश
याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, राज्यातील परिस्थिती दुरुस्त व्हावी म्हणून सल्ला घ्यायला आठवले माझ्याकडे आले होते. मात्र, जनादेश शिवसेना-भाजप युतीच्या पारड्यात आहे. त्यामुळे त्यांनीच सरकार स्थापन करावे. 'आठवलेंनी मत मांडले तर ते सगळेच गांभीर्यानं घेतात, असेही म्हणत पवारांनी कोपरखळी मारली.