मुंबई - कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यासाठी मुंबईमधील ज्या विभागात रुग्ण आढळून येत आहेत, अशा 146 ठिकाणी मुंबई महापालिकेच्या आणि पोलिसांच्या 5 हजार 200 सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवले जात आहे. अशा विभागांमध्ये जास्त गर्दी होऊ नये, तसेच या विभागांमधील नागरिक इतर ठिकाणी जाऊन कोरोनाचा प्रसार करू नयेत याची काळजी घेतली जात असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
तसेच मुंबईत आढळून आलेल्या 162 रुग्णांच्या संपर्कात असलेल्या 5 हजार 343 लोकांची माहिती मिळवण्यात आली असून ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट या तीन 'टी' वर आधारित काम केले जात असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.
मुंबई आणि महाराष्ट्रात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागात वॉर रूम तयार करण्यात अली आहे. या वॉर रूमला मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन आढावा घेतला. त्यानंतर आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सीसीटीव्हीद्वारे कोरोनाचे रुग्ण आढळले त्या विभागावर लक्ष ठेवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या विभागातील नागरिकांना अत्यावश्यक वस्तू पोहचवण्याचीही काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या 200 टीम बनवण्यात आल्या असून 3 हजार 105 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कोरोनाचे रुग्ण घराघरात जाऊन शोधले जात असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्या आणि खासगी रुग्णालयात 3 हजार 107 आयसोलेशन बेड तयार ठेवण्यात आले आहेत. सेव्हन हिल रुग्णलयात 1 हजार बेड तयार असून त्यापैकी 400 बेड वापरले जात आहेत. हे रुग्णालय लवकरच कोव्हीड रुग्णालय म्हणून जाहीर केले जाईल, असे आरोग्य मंत्र्यांनी संगितले.
पालिकेच्या 5 आणि खासगी 7 अशा एकूण 12 लॅबमध्ये कोरोना चाचणी केल्या जात आहेत. सध्या मुंबईमध्ये 2 हजार चाचण्या एकाच दिवशी केल्या जातील इतकी क्षमता आहे. त्यापैकी 1200 चाचण्या रोज केल्या जात आहेत. मुंबई पालिकेच्या रुग्णालयात सध्या 450 व्हेंटिलेटर आहेत. त्यात आज नव्याने 46 व्हेंटिलेटर लावण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयातही व्हेंटिलेटर असल्याची माहिती आरोग्य मंत्रीनी दिली.21 ते 40 वयोगटातील जास्त रुग्ण देशामध्ये सर्वाधीक महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात 230 रुग्ण असून त्यापैकी 162 रुग्ण मुंबईमधील आहेत. या रुग्णांमध्ये 24 ते 40 वयातील रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. या वयोगटातील लोक कामानिमित्ता बाहेर लोकांच्या संपर्कात असतात. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली असावी, अशी शक्यता आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
कोरोना रुग्णांमध्ये 21 ते 40 वयोगटातील रुग्ण जास्त संख्येने असले तरी ते बरे होत आहेत. मात्र, जे काही आतापर्यंत मृत्यू झाले आहेत त्यात 60 वर्षांवरील रुग्ण जास्त आहेत. त्यांना इतरही आजार असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.
- दिल्ली प्रकरणाचे कनेक्शन शोधले जात आहेत -
दिल्ली येथे मरकझसाठी काही मुस्लिम समाजातील लोक एकत्र आले होते. त्यामधील काही लोक महारष्ट्रातील असल्याचे समजते. अशा लोकांची माहिती पोलिसांकडून गोळा केली जात आहे. मात्र, त्यामधील अनेक लॉकडाऊन असल्याने त्याच ठिकाणी अडकल्याची माहिती आरोग्य मंत्रीनी दिली.