मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या 14 जून रोजी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. 'माझ्या वाढदिवशी शुभेच्छा द्यायला येऊ नका, आहात तिथे सुरक्षित राहा' असा सूचना वजा आदेश राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना केला आहे. तुम्ही सुखरूप असणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तसेच कोरोनाच्या संकटानंतर कार्यकर्त्यांना भेटणार असल्याचे राज ठाकरे यांनी ट्विटरवरून सांगितले आहे.
जोपर्यंत कोरोनावर औषध येत नाही, तोपर्यंत त्याच्यासोबत जगण्याची मनाने तयारी करा, असे मी यापूर्वी एका मुलाखतीत म्हटले होते. तशी तयारी सध्या एकूणच आता महाराष्ट्रने केलेली दिसून येत आहे, असे राज म्हणाले. गेल्या दोन ते तीन महिन्यात मनाला विषण्ण करणाऱ्या बातम्या येत होत्या. त्यात फक्त एकच दिलासा देणारी बातमी असायची, की कठीण प्रसंगी मनसेचा कार्यकर्त्या जीवावर उदार होऊन लोकांच्या मदतीला धावून जातोय. अन्नधान्य ते रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यापर्यंत मदत केलेल्या बातम्या माझ्यापर्यंत पोहोचत होत्या. त्यावेळी आनंद व अभिमान वाटत होता, असे राज ठाकरे म्हणाले.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक अनेकांनी व्यक्तिशः कळवले. तुमच्यासारखे सहकारी मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो, असे राज ठाकरे यांनी म्हणाले.