मुंबई - आज मनसेच्या ऑनलाईन सदस्य नोंदणीचा शुभारंभ आज राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुन्हा राज ठाकरे विनामास्क वावरताना दिसले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक आहे. मात्र, राज ठाकरे यांनी नेहमीच मास्क वापरणे टाळले आहे. परंतु राज ठाकरेंवर आजपर्यंत एकदाही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना एक न्याय, तर नेत्यांना दुसरा न्याय का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुंबईच्या महापौरांनी केली होती मास्क घालण्याची विनंती -
राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेरी बोलीभाषेत त्यांचे कान टोचले होते. तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीदेखील राज ठाकरे यांना वयोवृद्ध आईची आठवण करून देत मास्क घालण्याची विनंती केली होती. त्यामुळे आजच्या सदस्य नोंदणी मोहिमेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहताना राज ठाकरे मास्क घालतील अशी, चर्चा होती. मात्र, आजही ते मास्क न घालताच उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला उपस्थित अमित ठाकरे, नितीन सरदेसाईदेखील विनामास्क फिरत असल्याचे दिसून आले. परंतु राज ठाकरे यांच्या पत्नी शालिनी ठाकरे या मात्र याला अपवाद होत्या. त्यांनी मात्र मास्क घातले होते.
मनसेत सहभागी होण्याचे राज ठाकरेंचे आवाहन -
दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवात साधताना, सदस्य नोंदणीला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मनसेत सहभागी व्हावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
हेही वाचा- उद्धव ठाकरेंना कळेल त्यांचा ओसामा काय करीत होता; वझेंवरून सौमेयांचा निशाणा