मुंबई- कोरोनामुळे गेली सात महीने ग्रंथालयांची कवाडे बंद आहेत. या पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना ग्रंथालय उघडण्यासाठी फोन केला. लॉकडाऊनंतर अनलॉक 5 मध्ये बऱ्याच गोष्टी सुरू करण्यात आल्या. मात्र ग्रंथालयांची कवाडे बंदच आहेत.
राज्यातील ग्रंथालयांची कवाडे खुली करा, या मागणीसाठी प्राध्यापक माणिकराव किर्तन वाचनालयाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ग्रंथालयाचे विश्वस्त यांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. आणि महाराष्ट्रातील ग्रंथालय सुरू करण्याबाबत निवेदन दिले. त्यावेळी राज ठाकरे यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी फोनवर चर्चा केली. दरम्यान, उदय सामंत यांनी येत्या दोन दिवसात ग्रंथालय सुरू करणे बाबत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
पुस्तकं ही सकारात्मक ऊर्जा आणि वैचारिक आनंद देतात. कोरोनाच्या नैराश्यपूर्ण वातावरणात त्याची फार आवश्यकता आहे. म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये बंद केलेली ग्रंथालये पुन्हा सुरु करण्यात यावीत. त्यामुळे वाचन चळवळ वृद्धिंगत होईल. त्यावर अवलंबून असलेल्या अर्थचक्रालाही गती मिळेल, असे ग्रंथालय प्रतिनिधींनी राज ठाकरेंना सांगितले.