मुंबई - शहर आणि परिसरात शुक्रवारी रात्री मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर सकाळी काही प्रमाणात पावसाने उघडीप दिली होती. आता पुन्हा एकदा मुंबईत पावसाने जोर धरला आहे.
मुंबईतील वडाळा, कुर्ला, दादर, चिंचपोकळी, भायखळा परिसरात पावसाने सुरुवात केली आहे. मुंबई आणि परिसरात येत्या 24 तासात मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याची खबरदारी मुंबई महापालिकेसह इतर व्यवस्थापनाने घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईत सकाळच्या सत्रात सर्व शाळा सुरू होत्या. मात्र, दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करावी, असे निर्देश महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती महापालिका शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान मुंबई आणि परिसरात मोठ्या प्रमाणात काळोख पसरला असून, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.