मुंबई - जागितक वारसा स्थळात समावेश असलेल्या भायखळा स्थानकाचे सुशोभीकरण व सौंदर्यकरण करण्यात आले आहे. या नूतनीकरणानंतर स्थानकाचे शनिवारी औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी भायखळ्याच्या धर्तीवर इतर 9 स्थानकांचेही कायापालट करणार असल्याची घोषणा केली.
भायखळा प्रमाणेच आणखी 9 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट
गोयल यांनी भायखळ्याच्या धर्तीवर इतर 9 स्थानकांचाही कायापालट करणार असल्याचे सांगितले. यात ठाणे, डोंबिवली, वसई आणि निरजे स्थानकांचा समावेश आहे. डोंबिवली स्थानकाचा कायापालट डोंबिवलीकर संस्था करणार आहे. तर, निरजे स्थानकाचे काम आमदार मंगलप्रभात लोढा करणार असल्याचे गोयल म्हणाले. लोकांना रेल्वे सोबत जोडण्यासाठी दिल्लीत एक वेबसाईट लाँच केली होती. त्यावेळी अनेकांना रेल्वेसोबत येण्याचे आवाहन केले होते. त्याला अनेक उद्योजक सामान्य नागरिकांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे रेल्वेच्या या प्रकल्पाला "आय केअर फॉर माय रेल्वे" हे नाव देणे उचित ठरेल, असेही ते म्हणाले.
भारतातील सर्व पुलांची माहिती फलकावर मिळणार
देशात असलेले पादचारी पूल, उड्डाण पूल यांची संपूर्ण माहिती असलेले फलक यापुढे त्या पुलावर लावण्यात येणार आहेत. यात पूल केव्हा बांधला, संबंधित अधिकाऱ्याचे संपर्क क्रमांक, पूल कधी तयार केला आदी माहिती मिळेल. यामुळे नागरिक व रेल्वे यांत पारदर्शकता राहील, असे गोयल यांनी सांगितले.