मुंबई - अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी रेल्वेने काही गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, यात सोशल डिस्टनसिंगचा बोजवारा उडल्याचा आरोप करत रेल्वे कर्मचाऱ्यांनी विद्याविहार स्टेशनवर आंदोलन केले. कर्मचाऱ्यांनी संध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला रेल्वे रुळावरच काही काळ ठिय्या आंदोलन केले. यामुळे विद्याविहार स्थानक परिसरात गोंधळ उडाला होता.
अत्यावश्यक सेवेत काही रेल्वे कर्मचारी ही आहेत. मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांनाच बसायला जागा मिळत नाही. या गाड्यांच्या फेऱ्या ही वाढवल्या जात नसल्याचा आरोप यावेळी काही कर्मचाऱ्यांनी केला. पूर्व उपनगरातून हजारो कर्मचारी मुंबई परिसरात अत्यावश्यक सेवा देण्यासाठी येतात. कोरोना विरुद्धच्या लढाईत सरकार सोशल डिस्टनसिंग पाळण्याचे आवाहन करते, मात्र गाडीत गर्दी झाल्यावर हा नियम कसा पाळणार, असा संताप कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. दरम्यान विद्याविहार इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.