मुंबई - धारावीची झोपडपट्टी मोठी करण्यात काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा हात आहे. त्यांनी या भागाची वाट लावली आहे, अशी टीका दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी केली. शेवाळे यांनी माटुंगा 'फाईव्ह गार्डन' येथे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांना भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
सर्वच उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात व्यस्त आहेत. राहुल शेवाळे यांचा गार्डनमध्ये प्रवेश होताच 'हाऊ इज द जोश' अशा घोषणा नागरिकांनी दिल्या. स्वतःच्या फिटनेससोबतच देशाच्या फिटनेसची देखील काळजी घ्या आणि मतदान जरूर करा, अशा शब्दांत शेवाळे यांनी मतदारांना आवाहन केले. यावेळी नगरसेवक अमेय घोले, निहाल शहा, माजी शाखाप्रमुख संदीप चिवटे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
जी कामे एकनाथ गायकवाड यांनी ४० वर्षात केली नाही, ते काम ५ वर्षात मी केले आहे. अनेक विकास कामे या ५ वर्षात केली आहे. १३ वर्षांचा असताना गायकवाड आमदार होते, तेव्हा जी परिस्थिती होती ती आजही कायम आहे, अशी टीका शेवाळे यांनी गायकवाड याांच्यावर केली.