मुंबई : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुन्हा एकदा अपमान केला आहे. दरम्यान, यासंदर्भात त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सभागृहात केली आहे. त्यावरून सभागृहात बराचवेळ गदारोळ सुरू होता. तसेच, दोन्ही गट आक्रमक झाल्यानंतर शेवटी दोनवेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.
काँग्रेसने आंबेडकरांनाही पाडले : या संदर्भात बोलताना, आमदार संजय शिरसाट यांनी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. त्यावर, भारत कुठे तुटला होता? असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला होता. तसेच, त्यांनी काढलेल्या यात्रेबद्दल आपल्याला काहीही बोलायचे नाही. परंतु, या यात्रेदरम्यान त्यांनी जिथे-जिथे गेले तिथे-तिथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कृतीचा आपण धिक्कार करतो असही ते म्हणाले आहेत. काँग्रेसवाल्यांनी यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनासुद्धा निवडणुकीत पाडले होते. त्यामुळे यांना स्वातंत्र्यवीरांची त्यांनी दिलेल्या योगदानाविषयी काहीही देणे घेणे नाही, असे सांगत शिरसाट यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
काँग्रेसने सभागृहात माफी मागावी शेलार : भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी यासंदर्भात बोलताना, राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करीत आहेत. या संदर्भात राहुल गांधी यांनी आणि काँग्रेसने या सभागृहात माफी मागावी अशी मागणी केली. सत्ताधाऱ्यांच्या या गोंधळानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज एकदा दहा मिनिटांसाठी आणि त्यानंतर अर्ध्या तासासाठी तहकूब केले.
काय म्हणाले होते राहुल ? ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यानच्या शेगाव येथील भाषणामध्ये राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती. त्यांना आंदमानमधील तुरुंगामध्ये कारावासासाठी पाठवण्यात आलं. तेव्हापासून ते ब्रिटीशांना चिठ्ठ्या लिहून माफी मागत होते, असं विधान राहुल यांनी आपल्या भाषणामध्ये केल्याने भारतीय जनता पार्टीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुल गांधींनी यासंदर्भातील पत्रकार परिषद घेत सावरकरांनी लिहिलेल्या एका चिठ्ठीचाही संदर्भ देत आपलं म्हणणं प्रसारमाध्यमांसमोर मांडलं. मात्र राहुल यांच्या भूमिकेवरुन त्यांना विरोधकांनी लक्ष्य केलं आहे.
हेही वाचा : Rahul Gandhi Convict: दोषी ठरल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, 'सत्य आणि अहिंसा हा माझा धर्म'..