मुंबई - गौरी लंकेश यांच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचे विधान राहुल गांधी व सीताराम येचुरींनी केले होते. या विधानासाठी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला होता. मुंबईतील माझगाव न्यायालयात सुनावणीसाठी आज राहुल गांधी दाखल झाले होते. याप्रकरणी त्यांना जामीन मिळाला आहे. पत्रकारांशी बोलताना आजच्या खटल्याबद्दल जे बोलायचे होते, ते मी न्यायालयात सांगितले. मी गरीब शेतकऱ्यांच्या सोबत उभा असून हा लढा सुरुच राहणार, असे राहुल गांधी म्हणाले.
ही विचारांची लढाई आहे, मी गरीब शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या सोबत उभा आहे. समोरच्याकडून माझ्यावर आक्रमण होत आहे, मला आनंद आहे आणि हे युद्ध सुरुच राहणार. मला आजच्या या खटल्याबद्दल जे बोलायचे होते, ते मी न्यायालयात सांगितले आहे असे राहुल गांधी यांनी आज पत्रकारांना म्हटले.
पत्रकारांनी तुम्ही पुढे कसे लढणार याविषयी विचारले असता, त्यांनी सांगितले की, मागील पाच वर्षात जसे मेहनतीने लढलो, त्याच्यापेक्षा दहापटीने अधिक लढू, असे राहुल गांधी यांनी न्यायालयाबाहेर बोलताना सांगितले.
गौरी लंकेश यांच्या हत्येत आरएसएसचा हात असल्याच्या राहुल गांधी व सीताराम येचुरी यांच्या विधानावर रा. स्व. संघाचे कार्यकर्ते आणि वकील धृतीमान जोशी यांनी 2017 मध्ये अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. गुरुवारी मुंबईतील माझगाव न्यायालयात यावर सुनावणी होती. तेव्हा राहुल गांधी न्यायालयात हजर झाले. या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे.