मुंबई- देशभरात केंद्र सरकारने लागू केलेल्या सीएए कायद्याला सर्वत्र विरोध होत आहे. आता मुंबईतील महिला देखील सीएए आणि एनआरसी विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. मुंबई सेंट्रल येथील नागपाडा विभागात रविवारी रात्रीपासून या महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
हेही वाचा- मुंबईत जन्मलेला मुख्यमंत्री तुम्हाला मिळाला, मला मुंबईच्या प्रश्नांची जाण - मुख्यमंत्री
नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि एनआरसी वरून सुरू असलेल्या वादावर मुंबईतील मुस्लीम नेत्यांनी 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी सीएए आणि एनआरसी विरोधात मुख्यमंत्र्यांकडे या नेत्यांनी निषेध व्यक्त केला. ज्याप्रकारे पंजाब आणि केरळ सरकारने सीएएला विरोध केला. तसाच विरोध महाराष्ट्रातही करा, अशी मागणी त्यांनी केली. आपला विरोध केंद्र सरकारलाही कळावा यासाठी, मुंबईतील नागपाड्यात मुस्लीम धर्मीय महिला बेमुदत आंदोलनाला बसल्या आहेत.
महिलांच्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी पुरुषदेखील आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलनाची तीव्रता पाहता इथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जोपर्यंत सरकार कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले आहे.