मुंबई - लाचलुचपत विभागाच्या मुंबई पथकाने केलेल्या कारवाई दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या पी नॉर्थ वॉर्डच्या कनिष्ठ अभियंता संतोष पवार याच्या खासगी व्यक्तीस 50 हजार रुपयांची लाच घेताना अटक केलेली आहे. या प्रकरणी मुंबई महानगरपालिकेचा कनिष्ठ अभियंता संतोष पवार यासह लाच स्वीकारणारी खासगी व्यक्ती अब्दुल आहद खान या दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
या प्रकरणातील तक्रारदारांनी मालाड पश्चिम येथील मालवणी परिसरामध्ये असलेले घर नव्याने बांधण्यासाठी घेतले होते. या दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या पी नॉर्थ वॉर्डच्या कनिष्ठ अभियंता संतोष पवार याने या ठिकाणी जाऊन बांधकाम सुरू असलेल्या जागेचे फोटो काढले. हे बांधकाम अनधिकृत असून वैयक्तिकरित्या भेटण्यास तक्रारदारस सांगितले. तक्रारदाराने संतोष पवार याची भेट घेतल्यानंतर त्याच्याकडे कनिष्ठ अभियंता संतोष पवार याने 1 लाख 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्याचा पहिला हप्ता म्हणून 30 हजार रुपये संतोष पवारने स्वीकारले होते. त्यानंतर सतत त्याने तक्रार दाराकडे लाचेच्या पैशांचा तगादा लावला होता.
याप्रकरणी लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला असता अब्दुल आहद खान याला संतोष पवार याच्या वतीने 50 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. याबरोबरच संतोष पवार या कनिष्ठ अभियंताचा शोध पोलीस घेत आहेत. दोन्ही आरोपी च्या विरोधात कलम 7, 12, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्तांसाठी राज्य सरकारची 250 कोटींची मदत