मुंबई - राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही अटींसह दुकाने, रिक्षा, टॅक्सी तसेच अन्य व्यवहार सुरू झाल्यानंतर आजपासून (दि. 8 जून) खासगी कार्यालये सुरू होत आहेत. कार्यालयांमध्ये एकूण क्षमतेच्या १० टक्के कर्मचाऱ्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य केल्याने शासकीय कार्यालयांमधील लगबग वाढणार आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास गती मिळणार आहे.
पाचवी टाळेबंदी जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने विविध निर्बंध तीन टप्प्यांमध्ये शिथिल करणार असल्याचे जाहीर केले होते. यापैकी दोन टप्प्यांमध्ये व्यवहार सुरू झाले आहेत. सोमवारपासून खासगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई, नागपूर, ठाणे, पुण्यासह १८ महापालिका हद्दीत खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकणार नाहीत. एकूण कर्मचारी क्षमतेच्या दहा टक्के किंवा केवळ १० कर्मचाऱ्यांनाच कार्यालयात उपस्थित राहता येणार आहे. अन्य कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरातूनच काम करावे, असे बंधन सरकारने ठेवले आहे. कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असणारे आहे.
हेही वाचा - अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्यांना आता गृह विलगीकरणाचा पर्याय