अमरावती- अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणार्या वंदनीय राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांच्या ५२ व्या पुण्यतिथी महोत्सवाची तयारी पूर्ण झालेली आहे. येत्या ३० तारखेला पहाटे तीर्थ स्थापनेने या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात होणार आहे. तर, ५ तारखेला ४.५८ मिनिटांनी तुकडोजी महाराज यांना मौन श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील तुकडोजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोझरीतील समाधी परिसर हा आकर्षक रोषणाईने सजवण्यात आला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला दरवर्षी देश विदेशातून लाखो गुरुदेव भक्त येत असतात. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५० गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीमध्येच हा सोहोळा पार पडणार आहे. दरम्यान, गुरुदेव भक्तांनी घरूनच श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन अखिल भारतीय श्री. गुरुदेव सेवा मंडळाने केले आहे.
तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम हा दरवर्षी विद्यामंदिराच्या प्रांगणात पार पडत असतो. यावर्षी तो समाधी स्थळावर पार पडणार आहे. ६ तारखेला गोपाळ काल्याने या पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप होईल. ८ दिवसाच्या पुण्यतिथी महोत्सवमध्ये दरवर्षी विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. परंतु, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यतिथीत कुठल्याही मोठ्या कार्यक्रमाची रेलचेल राहणार नाही.
हेही वाचा- बोंड अळीमुळे कापसाचे नुकसान, शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची मागणी