मुंबई - महाराष्ट्रातील जनता या अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेली आहे. सरकार फक्त राजकीय घोषणा करत आहे. गेल्या काही दिवसात सरकारने दिलेली आश्वासने, घोषणा आणि किमान समान कार्यक्रमामध्ये ठरलेल्या गोष्टी जनतेला किती दिल्या? हे आज समजणार आहे. जादूगार काय जादू करतोय हे थोड्याचवेळात समोर येईल, असे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.
अर्थसंकल्पामध्ये त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. काल आर्थिक पाहणी अहवालामध्ये त्यांनी मागच्या सरकारवर खापर फोडले. मात्र, मागील सरकारच्या काळात अधिक कामे झालेली आहेत. ते खापर न फोडता आगामी काळात जनतेसाठी आपण काय करू? हे या सरकारने पाहणे महत्त्वाचे आहे. या सरकारचे १०० दिवस हे फक्त राजकीय टीकाटीप्पणी करण्यातच गेले आहे. या सरकारने जनतेसाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. राज्यसरकार शेतकरी, महिला आणि रोजगार निर्मिती, उद्योगधंद्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये काय जादू करतेय? याची आशा आम्हाला देखील लागली आहे, असे दरेकर म्हणाले.