मुंबई: विधिमंडळामध्ये औरंगजेबाच्या व्हॉट्सअप स्टेट्स व कबरीचा मुद्दा गाजला. औरंगजेबच्या मुद्द्यावरुन भाजपा आमदार नितेश राणे आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी हा मुद्दा उपस्थित करत सरकारला प्रश्न केला. औरंगजेबचे स्टेट्स ठेवल्याने मुस्लीम तरुणांवर कारवाई होते. परंतु वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर त्या कबरीवर जाऊन दर्शन घेतात. तरी त्यांच्यावर कारवाई का होत नाही? यावरुन सत्ताधारी आणि अबू आझमीमध्ये जोरदार वाद झाला होता. दरम्यान अबू आझमींच्या या प्रश्नाला प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिले. त्याचबरोबर त्यांनी सरकारवरही आरोप केला आहे.
दोघांची मिलीभगत: अबू आझमींच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीस यांना आव्हान दिले. महाराष्ट्र शासन आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे की,औरंगजेबाच्या कबरीवर किंवा कुठल्या समाधीवर जाण्यास बंदी असणारा कायदा आहे का? असेल तर दाखवा.अन्यथा गैरसमज पसरवणे थांबवा. विधिमंडळातील फडणवीस आणि अबू आझमी यांचे संवाद म्हणजे मिलीभगत असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. महाराष्ट्र सरकार हिंदू-मुस्लीमध्ये तेढ निर्माण करत असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
विधिमंडळामध्ये सध्या जो काही हंगामा चालू आहे. त्यातून महाराष्ट्रात वातावरण गरम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी राज्याच्या गृहमंत्र्यांना विचारतो, महाराष्ट्र शासनाला विचारतो, की कुठल्याही कबरीजवळ जाऊन किंवा कुठल्याही समाधीजवळ जाऊन तेथे नस्तमस्तक होणे याला बंदी आहे काय? महाराष्ट्रात तसा बंदी घालणारा कायदा आहे काय? असल्यास दाखवा.अन्यथा तुमच्या या अशा विधानांमुळे महाराष्ट्रात हिंदू-मुस्लीम तेढ वाढत आहे, हे लक्षात घ्या. माझा आरोप आहे की, महाराष्ट्र शासनच हिंदू-मुस्लीम तणाव वाढवत आहे.आधी कायदा दाखवा मगच तुम्ही त्याबद्दल बोला.विनाकारण हिंदू-मुस्लीम तेढ वाढण्यास भडक विधाने कोणी करू नका. - प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी पक्ष
भाजपला हिंदू-मुस्लीम वाद हवा: यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मणिपूर हिंसेवरुन भाजपावर जोरदार टीका केली. मणिपूर येथील नागरिकांना अत्याधुनिक शस्त्र कोणी पुरवली? मणिपूर येथे सामान्य लोकांच्या हातामध्ये अत्याधुनिक हत्यारे पोहोचलीच कशी? त्यांच्या हातापर्यंत शस्त्रे पोहोचवण्यासाठी कोणत्या-कोणत्या एजन्सी कार्यरत होत्या? मणिपूरनंतर आता हरियाणामध्ये हिंसेची आग पोहोचलेली आहे. याचाच अर्थ म्हणजे केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला हिंदू-मुस्लीममध्ये भांडण लावायचे आहे हे स्पष्ट दिसते, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
हेही वाचा-