मुंबई - हवामान विभागाने मुंबईत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. दुपारनंतर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. त्यामुळे सात दिवसाच्या गणपतींचे विसर्जन करणाऱ्या भक्तांचे हाल झाले. येत्या दोन दिवसात मुंबईसह कोकण, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल,असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मुंबईमध्ये गणेश आगमनापासून दरदोज पाऊस हजेरी लावत आहे. शनिवारी शहरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचुन रस्ते वाहतुकीचा खोळंबा झाला होता. आज (रविवार) दुपारनंतर देखील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कुलाबा येथे 5.6 मिलिमीटर तर सांताक्रूझ येथे 21.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
हेही वाचा - अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवा, मुख्यमंत्र्यांची कर्नाटक सरकारला विनंती
आगामी दोन दिवसात मुसळधार पाऊस -
येत्या दोन दिवसात पालघर, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल. मुंबई व उपनगरच्या काही भागात जोराचा पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.