मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा महाराष्ट्रातही दिवसें दिवस वाढत आहे. आणखी २ कोरोनाबाधित महिला आढळल्या आहेत. मुंबईमध्ये एका २२ वर्षीय महिलेला कोरोना असल्याचे आढळले आहे. ती महिला नुकतीच इंग्लडहून भारतात आली होती. तर दुसरी कोरोनाबाधित महिला उल्हासनगरमध्ये आढळली असून, ती दुबईहून भारतात आली होती. त्यामुळे राज्यात कोरोना विषाणूबाधित रुग्णाचा आकडा ४७ वर पोहोचला आहे.
राज्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही भितीचे वातावरण पसरले आहे. राज्य सरकारने हवी ती सर्व खबरदारी घेतली आहे. हा आजार प्रचंड वेगाने पसरत आहे. या आजारावर विशेष असं औषध निर्माण झालेलं नाही. त्यामुळे कोरोना फोफावत चालला आहे. या आजाराने इटलीत 825 पेक्षा जास्त तर स्पेनमध्ये 190 पेक्षा जास्त जणांचा बळी घेतला आहे. याशिवाय हजारो नागरिक कोरोनाने बाधित आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच देशातून आता खबरदारी घेतली जात आहे. भारताने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहेत. भारताने विदेशातून येणाऱ्या सर्व लोकांचा व्हिसा 15 एप्रिलपर्यंत रद्द केला आहे. याशिवाय भारताने सीमा सील केलं आहे. याशिवाय विदेशात राहणाऱ्या भारतीयांना केंद्र सरकारने भारत दौरा टाळण्याचा सल्ला दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 47 झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईत कालपर्यंत (बुधवार) कोरोनाचे 45 रुग्ण आढळून आले होते. आज सकाळी इंग्लड (युके) येथून आलेल्या मुंबईमधील एका 22 वर्षीय महिलेला तर दुबईला जाऊन आलेल्या 49 वर्षीय उल्हासनगर येथील महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 47 झाली आहे. मुंबईमधील कोरोनाची बाधा झालेल्या एका रुग्णाचा 17 मार्चला मृत्यू झाला आहे. या सर्व रुग्णांवर राज्यभरातील विलगिकरण कक्षात उपचार सुरू असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले आहे.
राज्यातील एकूण आकडेवारी 47
- पिंपरी चिंचवड 11
- पुणे 8
- मुंबई 9 (एकाचा मृत्यू)
- नागपूर 4
- नवी मुंबई 3
- यवतमाळ 3
- कल्याण 3
- रायगड 1
- ठाणे 1
- अहमदनगर 1
- औरंगाबाद 1
- रत्नागिरी 1
- उल्हासनगर 1