मुंबई: भारतीय निवडणुक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणुक आयोगाने पक्षाचे नाव शिवसेना तसेच पक्षाचे चिन्ह धणुष्यबाण शिंदे गटाला दिले आहे.
बाळासाहेबांचा विजय: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचारसरणीचा, आमच्या कार्यकर्त्यांचा, खासदारांचा, आमदारांचा, लोकप्रतिनिधींचा तसेच लाखो शिवसैनिकांचा हा विजय आहे. निवडणूक आयोगाने दिलेला हा निकाल लोकशाहीचा विजय आहे.
खरी शिवसेना शिंदेंचीच होती - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाला आहे हे खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी एकनाथ शिंदे यांचे मनापासून अभिनंदन करतो. आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगत होतो की खरी शिवसेना हीच आहे, कारण शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे. त्यामुळे तो विचार पुढे नेण्याचे काम एकनाथ शिंदे करता आहेत म्हणून कोणीही खाजगी मालमत्ता म्हणून शिवसेना सांगू शकणार नाही. शिवसैनिक आणि बाळासाहेबांचा विचार त्यांच्याकडे आहे तीच खरी शिवसेना ठरणार आहे, हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो, आज जो काही निर्णय झाला आहे निवडणूक आयोगाने दिला आहे त्यामुळे या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाला आहे.
आयोगाच्या निर्णायाचा फार परिणार होत नसते - शरद पवार
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, निकालावर चर्चा करता येत नाही. नवीन चिन्ह घ्यायचे. त्याचा फार परिणार होत नसते. काँग्रेसमध्ये वाद झाला. तेव्हा काँग्रेसची बैलजोडी ही खूण होती ती गेली. काँग्रेसने हात घेतला. लोकांनी मान्य केले. नवीन चिन्ह मिळेल ते लोकं मान्य करतील. फार परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
निकालामुळे बहुमताला मान्यता - चंद्रशेखर बावनकुळे
निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे. त्यासाठी आम्ही एकदा शिंदे यांचे अभिनंदन करतो. लोकशाहीमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी ज्याच्याकडे जास्त मतदान आहे. त्यालाच निवडणूक अधिनियममध्ये प्राधान्य मिळते. त्यानुसारच आजचा निकाल आला आहे. सत्यमेव जयते असा हा निकाल आहे. हा ऐतिहासिक निकाल आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजच्या दिवस कोरला जाईल. या निकालाने बहुमताला मान्यता मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मान्यता मिळाली आहे. यापुढे महाराष्ट्राला अभिप्रेत असलेली भाजप शिवसेना युती कायम राहील. महाराष्ट्राला चांगला सरकार युतीच्या माध्यमातून मिळेल.
बाळासाहेबांचा विचार किती अचूक होता ते निकालाने कळले - राज ठाकरे
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, बाळासाहेबांनी दिलेला 'शिवसेना' हा विचार किती अचूक होता ते निवडणूक आयोगाच्या निकालाने पुन्हा एकदा कळले.
भारताच्या लोकशाहीला बळकटी देणारा निर्णय - सुधीर मुनगंटीवार
राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आज सत्याचा पुन्हा एकदा विजय झाला आहे. केवळ घराणेशाहीच्या जोरावर भारतीय लोकशाहीतील राजकीय पक्ष ताब्यात ठेवता येणार नाहीत, असा हा स्पष्ट संकेत निवडणुक आयोगाने दिला आहे. पक्षांतर्गत लोकशाही बळकट करणारा हा निर्णय भारताच्या लोकशाहीला बळकटी देणारा, काही राजकीय पक्षांवर असलेली काही कुटुंबांची पकड ढिली करणारा आहे. या निर्णयामुळे भारतीय राजकारणातील एका मोठ्या स्वच्छता पर्वाला सुरूवात झाली आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही.
हिंदुत्वाच्या लढाईचे फलित - मंत्री चंद्रकांत पाटील
राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाचा निकाल हा लोकशाहीला अनुसरूनच आहे. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वासाठी केलेल्या लढाईचे हे फलित एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाले आहे.
सत्याचा विजय - आमदार प्रसाद लाड
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करतो. एकनाथ शिंदे यांचा झालेला विजय हा सत्याचा विजय आहे.
निवडणूक आयोग भाजपचा एजंट - ठाकरे गटाची टीका
आम्हाला ज्याचा संशय होता तेच घडत आहे अशी प्रतिक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. प्रवक्ते आनंद दुबे यांनी म्हटले आहे की, आमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही. जेव्हा प्रकरण सुप्रीम कोर्टासमोर आहे आणि कोणताही अंतिम निर्णय घेतला गेला नाही. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने घाईने निर्णय देणे म्हणजे ते केंद्र सरकारच्या अंतर्गत भाजपचे एजंट म्हणून ते काम करतात हेच दिसून येते. आम्ही याचा निषेध करतो, असे दुबे यांनी पुढे म्हटले आहे.
हा विजय विचारांचा - नरेश म्हस्के
शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ते म्हणाले की, हा विजय विचारांचा आणि लोकशाहीचा आहे. आम्ही ज्यासाठी अट्टाहास केला त्या संस्कारांचा हा विजय आहे. बाळासाहेब अमर रहे , दिघे साहेब अमर रहे, असेही त्यांनी सांगितले.