मुंबई: राष्ट्रीय काँग्रेसला गेल्या काही वर्षांमध्ये उतरती कळा लागली आहे. महाराष्ट्रात एकेकाळी पूर्ण ताकदीनिशी सत्तेवर असलेल्या काँग्रेसला आता विविध मतदारसंघांमध्ये आपले अस्तित्व टिकवण्यासाठी झगडावे लागत आहे. या परिस्थितीला काँग्रेसच्या काही चुकीच्या निर्णयांसह पक्षांतर्गत बंडाळी कारणीभूत असल्याचे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रवींद्र आंबेकर यांनी व्यक्त केले आहे. गेल्या काही महिन्यांमधील काँग्रेसच्या निर्णयाकडे आणि त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांकडे पाहता ही बाब प्रकर्षाने समोर येते.
पक्ष रोखू शकले नाही: काँग्रेसच्या राज्यातील फुटीला तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापासून सुरुवात झाली. सुजय विखे पाटील यांना भाजपने गळाला लावल्यानंतर पक्षात अस्वस्थ असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्ष रोखू शकले नाही. काँग्रेसचे अनेक नेते भाजपाच्या तंबूत शिरल्यानंतरही गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आपल्या जागा वाचवत अब्रू राखली होती. तर प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे बाळासाहेब थोरात यांच्याकडे आल्यानंतर राज्यात परिस्थिती आलबेल होईल असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही. राज्यात काँग्रेस मधील फूट थांबली नाही. काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गट हे नेहमीच राहिले आहेत. मुंबईमध्ये गुरुदास कामत संजय निरुपम आणि कृपाशंकर सिंग देवरा असे गट अस्तित्वात होते. आता यामध्ये भाई जगताप यांच्या गटाची भर पडली आहे. तर मराठवाड्यात देशमुख आणि चव्हाण तर नगरमध्ये थोरात आणि विखे पाटील हे गट कायम अस्तित्वात राहिले. मात्र अलीकडे या गटांमधील मतभेद प्रकर्षाने चव्हाट्यावर आले आहेत. त्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वेळोवेळी घेतलेली भूमिका कारणीभूत ठरली आहे.
काँग्रेसचे आघाडीचे प्रवक्ते नाराज : अतुल लोंढे यांची मुख्य प्रदेश प्रवक्ता पदी नियुक्ती नाना पटोले यांनी केल्यानंतर सचिन सावंत हे काँग्रेसचे आघाडीचे प्रवक्ते नाराज झाले. त्याचा फटका काँग्रेसच्या प्रतिमेला बसला आहे. नाना पटोले यांनी आपल्या महत्त्वकांक्षेपोटी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तेव्हा त्यांनी पक्षातल्या आणि आघाडीतल्या महत्त्वाच्या नेत्यांना विश्वासात घेतले नव्हते. यानंतर विधानसभा अध्यक्ष पद हे रिक्त राहिले आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला. काँग्रेसच्या वतीने ही सर्वात मोठी चूक होती. असे रवींद्र आंबेकर यांचे म्हणणे आहे.
पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली: नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्ष पदापेक्षा मंत्रीपदामध्ये अधिक रस होता. त्यांना नितीन राऊत यांच्याकडे असलेले ऊर्जा खाते हवे होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली होती. पटोले यांनी वारंवार राऊत यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पक्षांतर्गत दुफळी अधिक माजली. विधान परिषदा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे पहिल्या पसंतीच्या उमेदवार असतानाही पराभूत झाले. यालाही नाना पटोले यांचे राजकारण कारणीभूत असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. काँग्रेसचीच मते फुटली, फिरली हे उघडपणे दिसत होते. त्याचा एक अंतर्गत अहवाल ही केंद्रीय नेतृत्वाला पाठवण्यात आला. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
पक्ष आता उभा फुटीच्या वाटेवर: शिंदे फडणवीस सरकारच्या विश्वास मताचा ठराव विधानसभेत चर्चेला आला. तेव्हा काँग्रेस मधील काही वरिष्ठ आमदार आणि नेते मतदानाला गैरहजर राहिल्याची बाबही प्रकर्षाने समोर आली. काँग्रेसमधील ही अंतर्गत धुसफूस सत्यजित तांबे यांच्या प्रकरणानंतर चव्हाट्यावर आली. काँग्रेस मधील अनेक नेतेच परस्परांच्या वागणुकीकडे कशा अर्थाने पाहत आहेत हे स्पष्ट झाले. काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये नाना पटोले गट आणि बाळासाहेब थोरात गट पडला असल्याची वाच्यता केली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना नेहमी संधी मिळते असे म्हटले जात असतानाच, अंतर्गत राजकारण आणि पक्षातील बंडाळी यामुळे पक्ष आता उभा फुटीच्या वाटेवर आहे असे म्हणता येईल असेही आंबेकर म्हणाले.