मुंबई - पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या पत्नींनी आझाद मैदान येथे आंदोलन केले. पोलिसांना येत असलेल्या अडचणी व त्यांचा कुटुंबाच्या समस्या या पोलीस पत्नींनी वेळोवेळी सरकारकडे मांडल्या आहेत. मात्र, सरकार फक्त आश्वासन देते, पण सुरक्षा करणाऱ्या पोलिसांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काही पोलीस पत्नींनी आज एकदिवसीय आंदोलन केले.
पोलिसांच्या पत्नींनी केलेल्या मागण्या -
पोलिसांना ८ तासांच्या ड्युटीचा लेखी आदेश निघालाच पाहिजे, पोलिसांना हक्काची घरे मिळालीच पाहिजेत, पोलिसांच्या एका मुलाला सेवेत सामावून घेतले पाहिजे, २०११ व नंतरच्या पोलिसांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू झाली पाहिजे, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुलभ झाली पाहिजे, विधवा पोलीस पत्नीला एका महिन्यातच सर्व लाभ मिळाले पाहिजेत, एखाद्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास एका त्यांच्या अपत्यास नोकरी मिळेपर्यंत शासकीय निवास्थानाचे शुल्क वेतनानुसार आकारण्यात यावे, सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला मोफत वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, ७ वा वेतन आयोग महसूल विभागाप्रमाणे मिळालाच पाहिजे, ६ व्या वेतन आयोगाची थकबाकी मिळालीच पाहिजे, पोलीस सोसायटीकडून अल्पदरात गृहकर्ज मिळावे, वरिष्ठांकडून होणारा नाहक त्रास थांबलाच पाहिजे, पुरुष पोलीस अंमलदारांना पत्नीच्या प्रसूतीनंतर बालसंगोपन आणि पालकत्व रजा मिळालीच पाहिजे, प्रसाधन गृह, आराम कक्ष, पिण्याचे शुद्ध पाणी मिळालेच पाहिजे, पोलीस दलात जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे यासारख्या विविध मागण्या त्यांनी यावेळी सरकारपुढे मांडल्या.
आझाद मैदानात पोलीस पत्नींनी सुरू केलेल्या या आंदोलनाची दखल आता राज्य शासन घेणार का, नेहमी सारखेच तोंडाला पाने पुसणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.