मुंबई - दक्षिण मुंबईतल्या कुलाबा परिसरातील डान्सबारवर मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेकडून कारवाई करण्यात आली. या दरम्यान १५ जणांवर कारवाई करण्यात आली. या छाप्यावेळी मुंबई महानगर पालिकेचा मोठ्या पदावरील अधिकारी, मोठे व्यावसायिक यांच्यासह काही हाय प्रोफाईल लोकांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
कुलाबा परिसरात एका डान्सबारमध्ये बारबाला अश्लील चाळे करत असल्याची गुप्त माहिती समाजसेवा शाखेला मिळाली. या संदर्भात कारवाई करत डान्सबारवर छापा मारण्यात आला. पण कारवाई दरम्यान या डान्सबारमध्ये मुंबई महानगर पालिकेच्या एक मोठा अधिकारी काही हाय प्रोफाईल व्यक्ती व व्यावसायिकांसह बसलेला पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी या संदर्भात १५ ग्राहकांना ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामिनावर सोडले.