मुंबई - सीरियल किलर रामन राघव याला अटक करणाऱ्या पोलीस अधिकारी जिन अलेक्स फियालोह यांचे मुंबईत निधन झाले आहे. 1966 ते 1968 च्या दरम्यान मुंबईतील रस्त्यांवर तब्बल 41 निष्पाप नागरिकांचा जीव घेणाऱ्या रामन राघवसारख्या आरोपीला फियालोह यांनी मोठ्या शिताफीने अटक केली होती. फियालोह यांचे 92व्या वर्षी शुक्रवारी मुंबईतील वांद्रेस्थित राहत्या घरी निधन झाले.
गुंतागुंतीची प्रकरणे सोडविण्यात होते तरबेज -
मुंबई शहरात 1966 ते 1968 या दरम्यान रस्त्यावर झोपणाऱ्या नागरिकांचा दगड व लोखंडी रॉडने हत्या करणाऱ्या रामन राघवचा शोध मुंबई पोलीस घेत होती. यासाठी वेगवेगळ्या तपास पथकाचीसुद्धा नेमणूक करण्यात आली होती. मात्र, तब्बल तीन वर्षं रामन राघव हा पोलिसांच्या हाती लागलेला नव्हता. मात्र, डोंगरी पोलीस ठाण्यांमध्ये सहायक पोलीस निरीक्षक पदावर असताना जिन फियालोह यांनी रामन राघवचा छडा लावत त्याला अटक केली होती. मुंबई पोलीस खात्यात अत्यंत गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणण्यात फियालोह यांचा हातखंडा होता. मात्र, रामन राघवला अटक केल्यानंतर ते प्रकाशझोतात आले होते. रामनला अटक केल्यानंतर त्यांना राष्ट्रपतीपदकाने सुद्धा गौरविण्यात आले होते.
कोण होता रामन राघव-
रामन राघव हा सीरियल किलर म्हणून ओळखला जात होता. 1929 साली पुण्यात रामन राघवचा जन्म झाला होता. सिंधी दलवाई, दलवाई, अण्णा थांबी, वेलू स्वामी, सायको रामन यासारख्या विविध नावांनी रामन राघव हा गुन्हेगारी क्षेत्रात ओळखला जात होता. 1965 ते 1968 या दरम्यान मुंबईतील रस्त्यावर रामन राघव यांनी तब्बल 41 व्यक्तींचे खून केले होते. मुंबई पोलिसांनी रामन राघवला 27 ऑगस्ट 1968 रोजी अटक केली होती. रामन राघव याचा मृत्यू 7 एप्रिल 1995 रोजी पुण्यातील येरवडा जेलमध्ये किडनीच्या आजाराने झाला होता.
रामन राघव याला अटक झाल्यानंतर त्याच्यावर विविध खुनाच्या संदर्भात खटला चालवण्यात आला होता. मात्र, रामन राघव हा मनोरुग्ण असल्याचे समोर आल्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिक्षा सुनावल्यानंतर त्याला येरवडा कारागृहामध्ये ठेवण्यात आले. याठिकाणी त्याच्यावर मानसिक उपचार सुरू होते. रामन राघव याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार राघवला असलेला आजार हा कुठल्याही पद्धतीने ठीक होणारा नव्हता, त्यामुळे रामन राघवची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेमध्ये वर्ग केली होती.
हेही वाचा- 'भारत-पाकिस्तानने चर्चा करून सीमेवरील रक्तपात थांबवावा'