मुंबई- आझाद मैदान घोषणाबाजी प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेल्या उर्वशी चुडावालाचा मोबाईल आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी उर्वशी चुडावाला हिची पाच तास पोलिसांनी चौकशी केली. आझाद मैदान पोलिसांकडून 24 तारखेपर्यंत उर्वशीची चौकशी होणार आहे.
हेही वाचा-'आप'च्या राष्ट्र निर्माण अभियानात २४ तासात ११ लाख लोकांचा सहभाग
काय आहे प्रकरण
2 फेब्रुवारीला आझाद मैदान येथे समलैंगिक प्राईड मार्च माध्यमातून उर्वशी चुडावाला व तिच्या 50 सहकाऱ्यांनी देशद्रोहातील आरोपी शरजिल इमाम याच्या समर्थानात घोषणाबाजी केली होती. आसाम राज्याला भारतापासून वेगळे करू, असे वक्तव्य करणाऱ्या शरजिल इमाम याच्या समर्थनात घोषणा देताना 'शरजिल तेरे सपनोको हम मंजिल तक पोहचाएंगे', असे म्हणत उर्वशी चुडावाला व तिच्या सहकाऱ्यांनी घोषणा दिल्या होत्या. या घोषणांचा व्हिडिओ उर्वशी चुडावाला हिने तिच्या सोशल मिडियावर पोस्ट केला होता. मात्र, यावर सामाजिक, राजकीय वर्तुळातून मोठी टीका झाली. त्यामुळे उर्वशीने व्हिडिओ काढून टाकला होता.
दरम्यान, मुंबई पोलिसांकडून या प्रकरणात उर्वशी चुडावाला हिच्यासह 50 जनांच्या विरोधात देशद्रोह, राष्ट्रीय अखंडतेचा पूर्वग्रह, आणि सार्वजनिक गैरवर्तन विधान याच्या कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.