मुंबई: शहरातील दहिसर पूर्व भागातील आप्पासाहेब सिध्ये मार्गाचे काम मुंबई महानगरपालिका करीत नसल्यामुळे त्याच रस्त्यावर समांतर असलेला श्रीकृष्ण नगर येथील पुलाचे काम पूर्ण होऊन सुद्धा ह ब्रिज वाहनधारकांसाठी चालू करता येत नाही. त्यामुळे ठाकरे गटाचे स्थानिक माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला. ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासहीत आंदोलन कर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बोरिवली पूर्व श्रीकृष्णनगर पूल कार्यान्वित करण्यासाठी उपोषण करण्याआधी पोलिसांनी उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात: मुंबईतील दहिसर पूर्व राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या मिठी नदीवर बांधण्यात येत असलेला श्रीकृष्ण नगर पूल सुरू न केल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक ११च्या माजी नगरसेविका रिद्धी भास्कर खुरसंगे या कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसल्या होत्या. त्यामुळे बीएमसीने आधीच नोटीस बजावली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
राज्य सरकराची हुकूमशाही: महानगरपालिका व पोलिस विभाग यांनी रात्रीच्या रात्री उपोषणाचा स्टेज तोडुन टाकला ह्या कृत्याचा आम्ही निषेध करतो. भास्कर खुरसंगे व रिद्धी खुरसंगे यांना पोलीस विभागातर्फे नोटीस देखील बजावण्यात आली होती. श्रीकृष्ण नगरच्या पुलाचे काम पूर्ण झाले असून रिद्धी भास्कर खुरसंगे यांनी सदर पूल वाहतुकीसाठी आणि नागरिकांसाठी खुला करण्याची मागणी केली होती. महानगरपालिका पूल सुरू करण्यास विविध कारणे देत आहे तसेच विनाकारण विलंब करीत आहेत.
समस्येंमुळे नागरिकांना त्रास: महानगरपालिकेच्या मनमानी कारभार विरोधात आणि जनतेच्या हक्कासाठी महानगरपालिकेच्या विरोधात साखळी उपोषण आज करत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. परंतु राज्य सरकारच्या दबावाखाली महानगरपालिका व पोलिस विभाग नागरिकांचा आवाज दाबुन ठेवण्याचा प्रयत्न करत आहे व स्टेज देखील तोडुन टाकला. दहावी - बारावीची परीक्षा चालू आहे, सर्व नागरिकांना त्रास होत आहे. श्रीकृष्ण नगरचा ब्रीज लवकरात लवकर चालू करून राहणार, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
काय म्हणाले आंदोलनकर्ते: ठाकरे गटाचे माजी नगरसेवर भास्कर खुरसंगे म्हणाले की, या पूलाचे काम एक वर्षापासून सुरू असून एका बाजूचे काम पूर्ण झाले असले तरी तो जनतेसाठी खुला केला जात नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही उपोषण करत होतो. त्याआधी बीएमसीने रात्रीच आमचा तंबू उखडून टाकला आणि आम्हाला ताब्यात घेण्यात आले. बीएमसी सरकारच्या दबावाखाली काम करत आहे. आम्ही जनतेसाठी लढणार आहोत. १५ दिवसांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन होणार असल्याचे बीएमसीचे म्हणणे आहे.