मुंबई - महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या मुलाला पालिकेचे कंत्राट मिळवून दिले आहे. तसेच, एसआरएची घरे लाटली आहेत. याची तक्रार करूनही पालिका आयुक्त आणि ठाकरे सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे महापौरांची चौकशी करून त्यांची पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी केली. यावेळी पालिका मुख्यालयासामोर आंदोलन करणाऱ्या सोमैया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आंदोलनादरम्यान पत्रकारांशी बोलताना सोमय्या म्हणाले, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मुलाच्या नावे 'किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' ही कंपनी वरळीच्या गोमती जनता सोसायटी, जी. के. कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई- ४०००१३ या पत्त्यावर रजिस्टर आहे. याच पत्त्यावर ८ बोगस कंपन्या देखील रजिस्टर झालेल्या आहेत. त्या सगळ्याच कंपन्यांचे मालकी हक्क, आर्थिक हितसंबंध, व्यवहारातील पारदर्शकता आणि त्यातील आर्थिक व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे.
महापौर पेडणेकर यांनी एसआरएचे चार गाळे बळकावले असून त्याचीही चौकशी करावी, अशी मागणी केल्याची माहितीही सोमैया यांनी दिली. महापौर या पदावर असलेल्या व्यक्तीने आपल्या कुटुंबीयांना पदाचा गैरवापर करत लाभ करून दिल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, आयुक्तांनी आणि ठाकरे सरकारने महापौरांविरोधात कारवाई केली नाही, असे सोमैया म्हणाले. महापौरांची चौकशी करून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी करत एसआरएकडेही महापौरांची तक्रार करणार असल्याचे सोमैया यांनी सांगितले. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता, सोमैया यांच्या आरोपांना पुराव्यासह उद्या पत्रकार परिषद घेऊन उत्तर देऊ, असे सांगण्यात आले.
हेही वाचा- राज्यात राजकीय भूकंप होणार का ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटागटाने घेणार सेना आमदारांची भेट