मुंबई - काँग्रेसने राफेल विमान खरेदी प्रकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहे. मात्र, त्याचा आगामी निवडणुकीत भाजपवर काहीही परिणाम होणार नाही, असे वक्तव्य केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केले आहे. "भारत के मन की बात, मोदी के साथ" या प्रचार मोहिमेबाबत आयोजित पत्रकार परिषदेत गोयल बोलत होते. गेल्या साडेचार वर्षात मोदी सरकारने केलेल्या विकास कामांचा आवाका बघता, जनता पुन्हा भाजपवरच विश्वास दाखवणार आहे, असा दावाही गोयल यांनी यावेळी केला आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांनी राफेल प्रकरणी पंतप्रधान मोदी यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले. या आरोपांवर भाजप नेत्यांनी सभागृहात समर्पक उत्तरे दिली आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणात निर्वाळा दिला असल्याने आगामी निवडणुकीत याचा काहीही लाभ विरोधकांना मिळणार नाही, असे गोयल म्हणाले.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास काही दिवस बाकी असताना भाजपकडून 'भारत के मन की बात, मोदी के साथ' हे अभियान राबवले जात आहे. यामध्ये मागील पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली विकास कामे आणि धोरणे जनतेसमोर मांडण्यासाठी हे अभियान देशभरात राबवले जात आहे. या अभियानाच्या माध्यमाने जनतेच्या सूचना आणि प्रतिक्रिया घेण्यात येणार असून त्यावर आधारित लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा करण्याचा पक्षाचा संकल्प असल्याचेही गोयल यांनी सांगितले.
यावेळी बोलताना गोयल यांनी अनेक मुद्यांवर टिप्पणी केली. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत ही चांगली गोष्ट आहे. लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे. उलट या निवडणुकीत पवारांना पाडण्याची आम्हाला संधी मिळेल, अशी कोपरखळीही त्यांनी यावेळी मारली.
१० कोटी लोकांशी साधणार जनसंपर्क -
भाजपकडून भारत के मन की बात, मोदी के साथ ही रथयात्रा सुरू झाली असून यात आम्ही संपर्क, संवाद आणि लोकांची भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. 81 ठिकाणी आमचे नेते लोकांमध्ये जाऊन लोकांशी संवाद साधणार आहेत. या माध्यमातून १० कोटी लोकांशी जनसंपर्क होणार आहे. जगातील सर्वात मोठी संपर्क यात्रा असेल असेही गोयल म्हणाले. देशभरात साडे सात हजार पेट्या, 3500 रथ असणार आहेत. तसेच वेबसाईट आणि समाज माध्यमांद्वारे जनतेच्या मन की बात समजून घेणार आहात असेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यावेळी उपस्थित होते.