मुंबई - केरळमधील सीपीएम पक्षाचे प्रमुख बलाकृष्णन कोडीएरी यांचा मुलगा बिनोय कोडीएरी याच्या विरोधात मुंबई पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओशिवरा पोलिसांनी एका ३३ वर्षाच्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी बिनोय कोडीएरी याच्यावर गुन्हा दाखल केला.
या प्रकरणातील ३३ वर्षीय पीडित महिला दुबईमधील एका डान्स बारच्या माध्यमातून बिनोय कोडीएरी याच्या संपर्कात आली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर आपण अविवाहित असून आपल्यासोबत शरीरसंबंध ठेवल्यास लग्न करू, असे बिनोय पीडित महिलेला सांगितले. बिनोयच्या भूलथापांना बळी पडलेल्या पीडित महिलेने २००९ पासून २०१५ पर्यंत बोनोयसोबत शरीरसंबंध ठेवले होते. ज्यात त्यांना अपत्य झाले होते. मात्र २०१५ सालापासून दुबईतील बांधकाम व्यवसायात तोटा होत असल्याचे कारण देत बिनोयने पीडित महिलेला पैसे देण्यास नकार दिला असता, पीडितेने बिनोयला लग्न करण्यास सांगितले.
या दरम्यान पीडितेच्या घरच्यांना बिनोय भेटत होता. मात्र, पीडितेला स्वतःच्या घरच्यांशी ओळख मात्र करून देत नव्हता. बिनोय याच्या सोशल माध्यमांच्या माहितीवरून तो आगोदरच विवाहित असून त्यास दोन मुले असल्याचे पीडितेच्या लक्षात आले. या प्रकरणी वेळोवेळी लग्नाचा तगादा लावूनही आरोपी लग्न करीत नसून खर्चास पैसे देत नसल्याने पीडित महिलेने ओशिवरा पोलिसांकडे बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.