मुंबई : मातोश्री येथे आज मंगळवार (९ जानेवारी) रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, उध्दव ठाकरेंनी नुकत्याच झालेल्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर आक्षेप घेतला आहे. त्यावर बोलतना, न्यायाधीशच आरोपींना भेटणार असतील तर त्या न्यायाधीशांकडून न्यायाची काय अपेक्षा ठेवायची असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. 10 जानेवारी म्हणजे उद्या दुपारी 4 वाजता शिवसेना अपात्र प्रकरणाचा निकाल जाहीर होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून चर्चा, सुनावणी आणि उलटतपासणी सुरूय. गेल्या एप्रिलमध्ये सर्वोच्च न्यायालयानं निकाल वेळेवर जाहीर करावा, असं म्हटलं होतं. दरम्यान, 31 डिसेंबरची तारीख देण्यात आली होती. सुनावणी सुरू असताना त्यांचा वेळ वाया जात असल्याचं, आम्ही पाहिलं. मग त्यांनी वेळ वाढवून मागितला. त्यामुळे न्यायालयानं त्यांना 10 जानेवारी ही तारीख दिली. पण, आता न्यायाधीश आणि आरोपी बंद दाराआड चर्चा करत आहेत. त्यामुळे यावर काहीतरी तोडगा निघावा म्हणून आम्ही न्यायालयात गेलो, असंही ठाकरे यावेळी म्हणालेत.
हे वागण बेजबाबदारपणाचं : विधानसभा अध्यक्ष सध्या न्यायमूर्तींच्या भूमिकेत आहेत. अशा स्थितीत विधानसभा अध्यक्षांनी दोनवेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. याचा अर्थ न्यायाधीशांनी आरोपीची भेट घेतली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटायला हरकत नाही. मात्र, प्रकरण सुरू असताना भेट घेतली. जर तुम्ही आरोपीला त्याच्या घरी भेटले तर तुम्हाला कोणत्या न्यायाची अपेक्षा असेल? असंही ठाकरे म्हणालेत. "अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्याच्या तीन दिवस अगोदर अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेणं अत्यंत अयोग्य आहे. अध्यक्षांनी नि:पक्षपातीपणे काम करणं आवश्यक आहे. मात्र, अध्यक्षांचं सध्याचं कामकाज बेजबदरपणाचं आहे. निर्णय प्रक्रियेतील त्यांच्या निःपक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. असंही आपल्या तक्रारीत ठाकरे म्हणालेत.
16 आमदारांच्या अपात्रेवर निकाल : विधानसभा अध्यक्षांची सध्याची कृती म्हणजे कायदेशीर तत्त्वाचं उल्लंघन असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर 10 जानेवारी रोजी आपला निर्णय देणार आहेत. शिवसेनेच्या एकूण 40 आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेना फुटली आणि जून 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडीचं सरकार पडलं. त्यामुळे आता अध्यक्षांच्या निकालाला अवघे 24 तास उरलेले असताना काय निकाल येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
1 राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्र्यांना भेटत असतील तर शंकेला वाव-शरद पवार
2 रवींद्र वायकर यांच्या घरासह सात ठिकाणी ईडीची छापेमारी, राजकारण तापण्याची चिन्हे
3 ''कर नाही त्याला डर कशाला?'', रवींद्र वायकरांवरील धाडीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया