मुंबई - शहरातील तामिळनाडूच्या नागरिकांसाठी आज सीएसटीहून एक रेल्वे गाडी सोडण्यात येणार होती. धारावी येथील परप्रांतीयांना ही गाडी पकडण्यासाठी धारावी जंक्शन येथून बेस्टच्या बसेसने सीएसटीला सोडण्यात येणार होते. पण तामिळनाडू सरकारने रेल्वे गाडीलाच, राज्यात येण्यास परवानगी दिली नाही. यामुळे धारावीत राहणाऱ्या तामिळनाडूच्या नागरिकांनी नेत्यांच्या फोटोला चोप देत आपला संताप व्यक्त केला.
लॉकडाऊनमुळे रोजगार नसल्याने, मुंबईतील परप्रांतीय आपापल्या गावी पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शासनाकडून या लोकांसाठी रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. मुंबईतील तामिळनाडूमधील लोकांसाठी एक रेल्वे गाडी सोडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या रेल्वेसाठी महाराष्ट्र सरकार आणि साऊथ इंडियन फोरमने प्रयत्न केले. पण तमिळनाडू सरकारने ऐनवेळी रेल्वे गाडीला परवानगी नाकारली.
आज (शनिवार) तमिळनाडू येथील सोळाशे नागरिक धारावी जंक्शन येथील पोलीस ठाण्याजवळ आपल्या गावी जाण्यासाठी सकाळी आठ वाजल्यापासून रांगेत उभे होते. मात्र, तमिळनाडू सरकारने त्यांना घेऊन येणाऱ्या रेल्वेला परवानगी दिली नाही. त्यामुळे आता तुम्हाला जाता येणार नाही, असे मुंबई पोलिसांनी त्या परप्रांतियांना सांगितले. तेव्हा त्या नागरिकांनी तमिळनाडू सरकारमधील नेत्यांच्या फोटोला चोप देत राग व्यक्त केला.
दरम्यान, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेली धारावी कोरोनाचे हॉटस्पॉट बनली आहे. धारावीत मागील दोन महिन्यात कोरोनाचे 1 हजार 478 रुग्ण सापडले असून कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर मृतांचा आकडा 54 वर पोहोचला आहे.
हेही वाचा - विषाणूजन्य रोगांचे खापर शेतकऱ्यांच्या माथीच का?, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न
हेही वाचा - मुंबई उपनगरातील कंटेनमेंट झोनमध्ये सीआयएसएफचे जवान तैनात