मुंबई - राज्यासह देशात सध्या दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण आहे. देशातील बाजारपेठा प्रचंड मोठ्या प्रमाणात गजबजू लागलेल्या आहेत. मात्र, दिवाळीच्या या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे सल्ला आरोग्यतज्ञांनी दिला आहे.
नुकतीच कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी बाजारपेठेत होणारी गर्दी, मास्क सॅनिटायझरचा वापर केला नाही तर ते कोरोनाचे संकट ओढवू शकते. खरेदीसाठी बाजारात आलेले अनेक नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. तसेच सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर, अशा अनेक कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन करताना दिसत आहे. अनेक ठिकाणी गर्दीवर कुणाचही नियंत्रण नाही. बाजारात ग्राहकांनी प्रचंड गर्दी केल्यानं सामाजिक अंतर ठेवण्याला वावही उरत नसल्याचं दिसून येतं.
गेल्या काही महिन्यांत कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, कोरोना पूर्णपणे गेलेला नाही, हे नागरिकांनी लक्षात घ्यायला हवे.
धनत्रयोदशीपासून दिवाळीला प्रत्यक्षात सुरुवात होते. मागील वर्षी कोरोना धोरणाच्या प्रादुर्भावामुळे दिवाळी साजरी करता आली नव्हती. याचा खूप मोठा फटका बसला होता. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. यामुळे यंदा दिवाळीची तयारी सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांनीही जोरदार केली आहे. मात्र, हा सण आरोग्यदायी पद्धतीनं साजरा करण्यासाठी स्वस्थ राहणंही तितकंच गरजेचं आहे. कोरोनाच्या नियमावलीचे पालन करणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे.