मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाचा गेले वर्षभर प्रसार सुरू आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने नागरिकांना मास्क लावण्याचे बंधनकारक केले आहे. त्याचसोबत रस्त्यावर थुंकण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतरही नागरिक रस्त्यावर थुंकत असल्याचे समोर आल्याने पालिकेने दंडाच्या रक्कमेत दोनशे रुपयांहून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मान्यता दिली आहे. गेल्या सहा महिन्यात पालिकेने थुंकणा-यांकडून २८ लाख ६७ हजारांची दंड वसुली केली आहे.
दंडाची रक्कम वाढणार -
थुंकण्यामुळे कोरोना, क्षयरोग यासारख्या विविध रोगांचा प्रसार होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन सध्या सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर महापालिकेकडून दोनशे रुपये एवढा दंड आकारण्यात येत आहे. मात्र, ही रक्कम गेल्या अनेक वर्षांपासून रुपये दोनशे इतकीच असल्याने या रकमेत वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाला घेतला आहे. ही दंड रक्कम वाढविण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या प्रशासकीय प्रस्तावास महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मान्यता दिली आहे. यानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात आवश्यक ती पुढील कार्यवाही महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत आहे, अशी माहिती उप आयुक्त संजोग कबरे यांनी दिली.
कोर्टाच्या आदेशाने दंडाची रक्कम वाढणार -
सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर गेल्या सुमारे ६ महिन्यात १४ हजारांपेक्षा अधिक व्यक्तिंकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्ल तब्बल रुपये २८ लाख ६७ हजार ९०० इतकी दंड वसुली करण्यात आली आहे. याबाबत एका जनहित याचिकेच्या प्रकरणी उच्च न्यायालयाद्वारे देण्यात आलेल्या आदेशांनुसार ही कारवाई अधिक तीव्र करण्यासोबतच प्रभावी जनजागृती करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी वावरताना आवर्जून मास्क वापरावा, वारंवार हात धुवावेत किंवा सॅनिटाईज करावेत आणि दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
सर्वाधिक वसुली कुर्ला विभागात -
गेल्या ६ महिन्यांच्या कालावधीत २८ लाख ६७ हजार ९०० इतकी दंड वसुली करण्यात आली आहे. या अंतर्गत सर्वाधिक दंड वसुली ‘एल’ विभागातून करण्यात आली असून, ती ०४ लाख ७० हजार २०० इतकी आहे. या खालोखाल ‘ए’ विभागातून रुपये ०३ लाख २९ हजार ८००, तर ‘सी’ विभागातून रुपये ०२ लाख ७१ हजार ४०० इतकी दंड वसुली करण्यात आली आहे.