मुंबई : रेल्वेने उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग (ACP) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. अलीकडे प्रवासी उशिरा पोहोचल्यामुळे, मधल्याच स्थानकांवर उतरण्या/चढणे इत्यादी अनावश्यक कारणांसाठी अलार्म चेन पुलिंग (ACP)चा सहारा घेत असल्याचे दिसून आले आहे.
पाठीमागून येणाऱ्या गाड्यांवरही होतो परिणाम : ट्रेनमधील अलार्म चेन पुलिंग (ACP) च्या कृतीचा केवळ त्या विशिष्ट ट्रेनच्या चालण्यावरच परिणाम होत नाही, तर पाठीमागून येणाऱ्या गाड्यांवरही परिणाम होतो. मुंबई विभागासारख्या उपनगरीय प्रणालीमध्ये, यामुळे मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्या उशिराने धावतात आणि त्याच्या वक्तशीरपणाला बाधा येते. तसेच एक किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी एसीपीचा गैरवापर केल्याने इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते.
सुमारे 1,169 प्रवाशांवर कारवाई : मध्य रेल्वे मुंबई विभाग अशा अनावश्यक अलार्म चेन पुलिंग (ACP) घटनांवर बारीक लक्ष ठेवून आहे. दि. 1 एप्रिल 2022 ते 26 ऑक्टोबर 2022 या वर्षात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 1,706 अनावश्यक अलार्म चेन पुलिंग (ACP) प्रकरणांची नोंद झाली आहे. यापैकी सुमारे 1,169 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 5.85 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
कलम 141 नुसार दंडनीय गुन्हा : मध्य रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे कि, अनावश्यक कारणांसाठी अलार्म चेन पुलिंग (ACP)चा सहारा घेऊ नका ज्यामुळे इतरांची गैरसोय होईल. अनावश्यक परिस्थितीत अलार्म चेन पुलिंग (ACP) करणे हा रेल्वे कायद्याच्या कलम 141 नुसार दंडनीय गुन्हा आहे. अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए के सिंग यांनी दिली आहे.