मुंबई - घाटकोपर पश्चिम येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावर सर्वोदय एसटी थांबा याठिकाणी असणारे स्थानक महापालिकेने निष्कासित केले. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे याठिकाणी पूर्वीप्रमाणे सर्व सुविधा असलेले एसटी स्थानक तयार करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन आज घाटकोपरमधील विविध सामाजिक संस्था आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी पालिका एन. वॉर्डचे उपायुक्त रणजित ढाकणे यांना दिले.
घाटकोपर पश्चिम येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावर सर्वोदय एसटी थांबा हे ३० वर्षापेक्षा जास्त जुने आहे. हे एसटी थांबा स्थानक पालिकेने डिसेंबर महिन्यात रस्ता रुंदीकरणाचे कारण पुढे करत निष्कासीत केले. परंतु चार महिना उलटून देखील स्थानक तयार न झाल्याने अखेर घाटकोपर प्रगती मंच या व्हॉट्सअप ग्रुपच्या सदस्यांनी याठिकाणी तात्पुरता निवारा उभा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पालिकेने त्याचेही निष्कासन केले. त्यामुळे घाटकोपरमधील संतप्त नागरिक आणि सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येत बस थांब्यावर ठिय्या आंदोलन केले होते. दरम्यान, आज घाटकोपरमधील विविध सामाजिक संस्था आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी पालिका एन. वॉर्डला घेराव घातला आणि आपले निवेदन पालिका उपायुक्त रणजित ढाकणे यांना दिले.
घाटकोपर पश्चिम सर्वोदय एसटी बस थांबा-स्थानक येथून जुन्नर, आळेफाटा, भीमाशंकर, गोरेगाव, राजगुरूनगर, कोकण व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एसटी बसेस जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी एसटी बस पकडण्यासाठी याठिकाणी येत असतात. उन्हाळयाच्या सुट्टीचे दिवस असल्याने या स्थानकाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवासी येत असतात. परंतु कडाक्याच्या उन्हात स्थानकाचे शेड नसल्याने तसेच याठिकाणी आसन व्यवस्था नसल्याने प्रवाशांना उन्हात रस्त्यावर ताटकळत बॅगांवर किंवा कागद टाकून चक्क रस्त्यावर बसून रहावे लागते. त्यामुळे याठिकाणी तत्काळ तात्पुरते शेड आणि आचारसंहिता संपल्यावर पूर्वीप्रमाणे सर्व सुविधा असलेले एसटी स्थानक तयार करावे, अशी मागणी घाटकोपर आणि विक्रोळी येथील नागरिक करीत आहेत.
दरम्यान, आज घाटकोपरमधील वेगवेगळ्या सामाजिक संस्था, सोशल मीडिया ग्रुपतर्फे महानगरपालिका एन वॉर्ड उपायुक्त रणजित ढाकणे यांना निवेदन दिले. यावेळी ढाकणे यांनी त्या जागेवर तात्पुरता शेड उभे करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले असल्याचे घाटकोपर येथील स्थानिक आर. जी. हुले यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.