मुंबई: आज (सोमवारी) काँग्रेस मुख्यालय येथे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करण्यात आला. प्रसंगी बोलताना महाराष्ट्राची अधोगती थांबवून पुन्हा एकदा राज्याला देशात अव्वल बनविण्याचा संकल्प महाराष्ट्रदिनी करुयात, असे आवाहन पटोले यांनी केले.
भाजप कार्यकाळात राज्याची अधोगती: महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर 'देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य' असी महाराष्ट्राची ओळख निर्माण करण्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून तर पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत काँग्रेसच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी राज्याला प्रगतीपथावर नेले होते. काही वर्षांपासून दिल्लीच्या आदेशावरून भाजप सरकार महाराष्ट्राला अधोगतीकडे नेत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
अधोगती रोखण्याचे काम गरजेचे: आमच्या सरकारने महाराष्ट्रात गुंतवणूक वाढावी यासाठी पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण केले. कायदा, सुव्यवस्था उत्तम राखली. ज्यामुळे महाराष्ट्र हे देशात सधन आणि गुंतवणुकीसाठी पहिल्या पसंदीचे राज्य म्हणून उभे राहिले; परंतु राज्यात सध्या गुंतवणूक येऊ दिली जात नाही. येथील प्रकल्प गुजरात राज्यात जात असल्यामुळे आपल्याकडे बेरोजगारी वाढत आहे. महाराष्ट्राची ही अधोगती रोखण्याचे काम करायचे आहे, असे मत पटोले यांनी मांडले.
भांडवलदारधार्जिणे कायदे बनवले: देशाच्या जडणघडणीत कामगारांचे मोठे योगदान आहे. त्यांना न्याय व हक्क मिळाले पाहिजेत यासाठी काँग्रेस सरकारने कायदे केले; पण भाजप सरकारने ते कायदे बदलून भांडवलदारधार्जिणे कायदे बनवले आहेत. नव्या कामगार कायद्यामुळे कामगार हे मालकांचे गुलाम बनणार आहेत. असे कायदे करणाऱ्या पक्षाला घरी बसवा, असे आवाहन देखील पटोलेंनी केले.
आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री: ज्याचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री अशा प्रकारचे सूत्र साधारणतः असते. त्यामुळे आपण महाविकास आघाडीत असलो तरी आपल्याला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्या अनुषंगाने काही विधाने झाली असतील. 'मविआ'त शिकस्त करून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे लक्ष असल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
जनतेच्या भावना चिरडून टाकल्या: महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला जनतेशी काही घेणं देणं नाही. हम करे सो कायदा अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे बारसू येथे रिफायनरी विरोधात संघर्ष तीव्र झाल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत. प्रकल्पाच्या विरोधात काँग्रेस नाही. म्हणून मी बरसूला भेट दिली होती. त्यावेळी हजारो नागरिकांनी प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता.