मुंबई : या प्रकरणी शारदाश्रम विद्यामंदिर या शाळेत शिकणाऱ्या या विद्यार्थिनीच्या पालकांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तर, विद्यार्थिनीला अपमानित केल्याबाबतचे आरोप शाळेने फेटाळले आहेत. वर्षभरापासून फी न भरल्याने विद्यार्थिनीला चाचणी परीक्षेला बसू दिले नाही, असे स्पष्टीकरण शाळेने दिले आहे.
मुलीला दुसऱ्या रुममध्ये ठेवले : आमची मुलगी दुसऱ्या वर्गात शिकते. तीला शाळेची फी भरली नाही म्हणून घटक चाचणी परीक्षेला बसून न देता दुसऱ्या एका रुममध्ये ठेवण्यात आले. तसेच, तीला त्रास देऊन अपमानित करण्यात आल्याचा आरोपही या विद्यार्थिनीचे पालक मृगेंद्र राणे यांनी केला आहे. दरम्यान, त्यांनी या घडलेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करत शाळेच्या विरोधात दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
वारंवार शाळेची फी भरावी यासाठी सूचना केल्या : या सर्व प्रकारावर शाळेने आपली बाजू मांडली आहे. यामध्ये, मागील वर्षापासून या पालकांनी आपल्या मुलीची शाळेची फी भरलेली नाही. त्यांना वारंवार शाळेची फी भरावी यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच, त्यांना भेटण्यासाठीही बोलावण्यात आले होते. मात्र, तरीही पालक फी भरण्यास तयार नसल्याने या विद्यार्थिनीला घटक चाचणी परीक्षेला बसू दिले जाणार नाही असा निर्णय शाळेने घेतला असे आपल्या प्रतिक्रियेत शाळेने नमूद केले आहे.
एकटीला बसवले नाही : आम्ही या विद्यार्थिनीला कुठल्याही प्रकारे अपमानित केलेले नाही. या मुलीला ज्या दिवशी चाचणी परीक्षेला बसू दिले नाही त्या दिवशी आम्ही तिला एकटीला रुममध्ये बसवलं असा त्यांच्या पालकांचा आरोप आहे. मात्र, तसे नसून ती मुलगी स्टाफ रुममध्ये शिक्षकांसोबत बसली होती. त्यामुळे हा आरोप खोटा आहे असही शाळेचे अध्यक्ष गिरीराज शेट्टी यांनी आपल्या स्पष्टीकरणात सांगितले आहे.
पालकांच्या फिवरच शाळेचे काम चालते : शारदाश्रम इंटरनॅशनल स्कूल ही शाळा विनाअनुदानित आहे. तीला कुठलेही अनुदान नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांकडून जी फी मिळते त्या फिवरच या शाळेचे सर्वकाही काम चालते. यामध्ये शिक्षकांचे पगार, शाळेतील इतर कर्मचाऱ्यांचे पगार, शाळेतील इतर गोष्टींना लागणारा खर्च अस सर्व या पैशांतून भागवले जाते. त्या पार्श्वभूमीवर पालकांनी जबाबदारी ओळखून वेळेवर फी भरावी, या अपेक्षेने आम्ही वेळोवेळी फीबद्दल मागणी करतो असे मतही आपल्या प्रतिक्रियेच शाळेकडून व्यक्त करण्यात आले आहे.