मुंबई - मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेने रुग्णांच्या सेवेसाठी जीवक रोबोटची निर्मिती केली आहे. या रोबोटमुळे कोरोना रुग्णांची काळजी घेणे सोपे व सुरक्षित होणार आहे. रेल्वेच्या भायखळा येथील रुग्णालयात डॉक्टरांच्या मदतीला रुग्णांच्या सेवेत जीवक रोबोट दाखल झाला आहे.
कोविड योद्धांना चांगल्या सुविधा पुरवण्याच्या हेतूने डॉक्टर आणि रुग्णांच्या सेवेसाठी हा रोबोट तयार करण्यात आला आहे. हा रोबोट रिमोट कंट्रोलच्या मदतीने रुग्णांच्या बेडपर्यंत जातो. तसेच रक्तदाब, ऑक्सिजन पातळी तपासणे, शरीराचे तापमान तपासणे आदी कामे करतो. यामुळे रुग्णांना पाहून डॉक्टरांना व्हर्च्युअल तपासणीही करता येणार आहे. तसेच डॉक्टरांना रुग्णांशी संवाद साधता येणार आहे.
रुग्णांना नियमित औषधे देण्यासाठी या जीवक रोबोटमध्ये औषधपेटी देखील ठेवण्यात आली आहे. जीवकला निर्जंतुकीकरण करून दुसऱ्या रुग्णांसाठी वापरता येते. हा जीवक रेल्वेच्या भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आला आहे. तर, यापूर्वी परळ कारशेडमध्ये कोविड योद्धांसाठी मास्क, पीपीई किट, सॅनिटायझर, ऑक्सिजन ट्रॉली तयार करण्यात आली आहे.
हेही वाचा - 5 हजार खाटांचे संसर्गजन्य रोगांचे रुग्णालय भांडुप की मुलुंडमध्ये? लवकरच होणार निर्णय