मुंबई : केंद्र सरकारने बाहेरच्या राज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी राज्य सरकारला परवानगी दिली. मात्र, ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी सरकारला चालकच मिळत नसल्याचा प्रकार राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी उघडकीस आणला. तसेच एसटीच्या चालकांची मदत घेऊन ऑक्सिजन टँकर राज्यात आणणार असल्याची माहिती परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. त्याचे काम परिवहन विभाग पाहत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे काही टँकर्सचे ड्रायव्हर्स गावाला निघून गेले आहेत. त्यामुळे ड्रायव्हर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी परिवहन विभागाच्या ड्रायव्हर्सद्वारे आम्ही ऑक्सिजनचे टँकर उपलब्ध करून देणार आहोत. तसेच राज्यात आजपासूनच ऑक्सिजन पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोग्य विभागाशी समन्वय साधत आहोत, असे परब म्हणाले.
राज्यपालांशी वाद नव्हताच-
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना गोव्याला जाण्यासाठी सरकारी विमान देण्यात आले. त्यामुळे राज्यपाल आणि सरकारमधला वाद संपला आहे का? असा सवाल विचारण्यात आला. त्यावर परब म्हणाले, की 'राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नव्हता'.
दरम्यान, ब्रुक फार्मावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. फार्माच्या संदर्भात गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे मला यावर काही बोलायचं नाही, असेही ते म्हणाले.